Samajwadi Party’s senior leader Mulayam Singh Yadav passed away after a long illness
समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंग यादव यांचं दीर्घ आजारानं निधन
नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांचं आज सकाळी दीर्घ आजारानं निधन झाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते.
दिल्लीजवळ गुरगावमधल्या खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८२ वर्षांचे होते. २२ ऑगस्टपासून ते रुग्णालयात दाखल होते आणि गेल्या १० दिवसांपासून अतिदक्षता विभागात होते.
त्यांच्या पार्थिवावर उद्या सैफेई अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुले असा परिवार आहे. त्यांचा मुलगा अखिलेश यादव आता पक्षाचे अध्यक्ष आहेत. १९३९ मध्ये उत्तरप्रदेशातल्या सैफेई गावात जन्मलेले मुलायम सिंग, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, मधू लिमये यांच्यासारख्या समाजवादी नेत्यांपासून प्रभावित होऊन राजकारणात आले.
श्री. मुलायम सिंह यांनी करहल येथील महाविद्यालयात काही काळ व्याख्याता म्हणूनही काम केले. एकेकाळी कुस्तीचा आखाडा गाजवलेले मुलायम सिंग ३ वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. १९६७ मध्ये पहिल्यांदा ते उत्तर प्रदेश विधानसभेत निवडून गेले. १९७७ मध्ये राम नरेश यादव यांच्या मंत्रीमंडळात सहकार आणि पशुपालन खात्याचे मंत्री म्हणून त्यांचा पहिल्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली. याचवर्षी ते लोकदलाचे अध्यक्ष झाले.
१९८० मध्ये त्यांची जनता दलाचे अध्यक्ष म्हणून निवड जाली. १९९२ मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली आणि पुढच्याच वर्षी बहुजन समाज पक्षाबरोबर युतीकरून ते सत्तेत आले. एकूण १० वेळा विधानसभा आणि ७ वेळा लोकसभा निवडणूक त्यांनी जिंकली होती.
१९९६ ते १९९८ या काळात त्यांनी संरक्षणमंत्रीपदही भूषवलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांच्यासह देशभरातल्या मान्यवरांनी मुलायम सिंग यांना आदरांजली व्यक्त केली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ते देशाच्या तळागाळातून निवडून आलेले आणि सर्व राजकीय पक्षीय नेत्यांसाठी आदरणीय नेते होते, असं राष्ट्रपतींनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
उपराष्ट्रपती जगदीप धनखर
समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांच्या निधनावर उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी शोक व्यक्त केला आहे. आज एका ट्विटमध्ये श्री धनखर म्हणाले की, मुलायम सिंह यादव यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. ते म्हणाले की श्री मुलायम हे एक प्रतिष्ठित राजकीय नेते होते ज्यांनी आपले जीवन लोकांच्या सेवेसाठी समर्पित केले. ते म्हणाले, नम्र कृषीवादी पार्श्वभूमीतून आलेल्या मुलायमसिंह यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून राष्ट्र उभारणीत मोठे योगदान दिले. श्री धनखर यांनी श्री मुलायम यांच्या कुटुंबातील सदस्यांना आणि चाहत्यांना त्यांच्या मनापासून शोक व्यक्त केला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
आणीबाणीच्या काळात त्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आणि लोकसभेत त्यांनी देशहिताचे मुद्दे उपस्थित केले असं प्रधानमंत्र्यांनी शोकसंदेशात सांगितलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांच्या निधनावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शोक व्यक्त केला आहे. आज एका ट्विटमध्ये श्री. शाह म्हणाले की, मुलायम सिंह हे त्यांच्या अद्वितीय राजकीय कौशल्याने अनेक दशके राजकारणात सक्रिय राहिले. ते म्हणाले, श्री मुलायम यांनी आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी आवाज उठवला आणि तळागाळातील नेता म्हणून ते नेहमीच स्मरणात राहतील. मुलायमसिंग यादव यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एका युगाचा अंत झाल्याचे शाह म्हणाले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून दिवंगत आत्म्याला शोक व्यक्त केला.
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर
समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांच्या निधनाबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी शोक व्यक्त केला आहे. आज एका ट्विटमध्ये श्री ठाकूर म्हणाले की, समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एका युगाचा अंत झाला आहे. मुलायमसिंग यादव यांच्या राजकीय कार्यशैलीने सर्वांना प्रेरणा दिली असून आणीबाणीच्या काळात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य आणि लोककल्याणासाठी घेतलेले पुढाकार नेहमीच स्मरणात राहतील, असे ते म्हणाले.
भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा
समाजवादी पक्षाचे सरदार मुलायम सिंह यादव यांचे आज सकाळी निधन झाल्याबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, त्यांनी अनेक दशकांपासून भारतीय राजकारणाचा आधारस्तंभ बनून समाज आणि देशाची सेवा केली. श्री. नड्डा म्हणाले की मुलायमसिंग यादव हे आणीबाणीच्या काळात तळागाळातील नेते आणि लोकशाही मूल्यांचे पुरस्कर्ते म्हणून नेहमीच स्मरणात राहतील.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
श्री मुलायमसिंह यादव हे देशाच्या आणि विशेषतः उत्तर प्रदेश राज्याच्या राजकारणातील एक धुरंधर नेते होते. व्यापक जनसंपर्क व संघटन कौशल्यामुळे त्यांची राजकारणावरील पकड कायम राहिली. उत्तम संसदपटू असलेल्या मुलायमसिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून उत्तम काम केले होते. आपण उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य होण्यापूर्वीपासूनच आपला मुलायमसिंह यादव यांचेशी घनिष्ठ परिचय होता. सर्व पक्षातील लोकांशी त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांच्या निधनामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक मोठा अध्याय संपला आहे. दिवंगत मुलायमसिंह यादव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व आपल्या शोकसंवेदना श्री अखिलेश यादव तसेच त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना कळवतो’’, असे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
समाजवादी पक्षाचे संस्थापक, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांच्या निधनाने देशाच्या राजकारण, समाजकारणातील एक धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, अशा शब्दांत शोक व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यांचे वर्णन उच्च आदराचे नेते म्हणून केले आहे ज्यांचा प्रत्येकजण आदर करतो. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ज्येष्ठ राजकारणी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. देशाचे संरक्षण मंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री या नात्याने मुलायम सिंह यांचे योगदान नेहमीच अविस्मरणीय राहील, असे त्या म्हणाल्या.
सीपीआय (एम) सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी त्यांचे वर्णन उपेक्षित आणि मागासलेल्यांच्या हिताचे चॅम्पियन असे केले. बसपा प्रमुख मायावती यांनीही शोक व्यक्त केला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला म्हणाले की ते लोकनेते होते ज्यांनी आपले सर्व आयुष्य गरिबांच्या कल्याणासाठी समर्पित केले. RJD प्रमुख लालू प्रसाद यादव म्हणाले की, समाजवादी चळवळ पुढे नेण्यात मुलायम सिंह यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
उत्तर प्रदेश सरकारनं मुलायम सिंग यांच्या निधनामुळं ३ दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. त्यांचे अंत्यसंस्कार संपूर्ण शासकीय इतमामात केले जाणार आहेत.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com