Selection of Maharashtra for Multidisciplinary Education and Research Improvement Project in Technical Education
तंत्र शिक्षणातील बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन सुधारणा प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात दादा पाटील यांनी मानले पंतप्रधानांचे आभार.
मुंबई : राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या शिफारशींनुसार केंद्र सरकारकडून जागतिक बॅंक अर्थसहाय्यीत तंत्र शिक्षणातील बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन सुधारणा प्रकल्प (Multidisciplinary Education and Research Improvement in Technical Education) राबविण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्रची निवड केली आहे. त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात दादा पाटील यांनी आभार मानले.
या प्रकल्पांतर्गत केंद्र शासनाने देशातील एकूण १५ राज्यांची निवड केली आहे.त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे असे केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाने पत्राद्वारे कळविल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
या प्रकल्पासाठी देशातील साधारणत: १५० ते १७५ पदवी संस्था आणि १०० पदविका संस्थांची निवड प्रकल्पाच्या निकषांच्या आधारे केंद्र व राज्याद्वारे करण्यात येणार आहे. हा प्रकल्प एकूण रु. ४ हजार २०० कोटी इतक्या निधीचा असून प्रकल्प कालावधी ५ वर्ष आहे. प्रकल्पात निवड झालेल्या प्रत्येक पदवी संस्थेला १० कोटी तर पदविका संस्थेला प्रत्येकी ५ कोटी रुपये असे अनुदान प्रकल्प कालावधीमध्ये केंद्र सरकारकडून प्राप्त होणार आहेत.
यामध्ये संस्थांमधील प्रयोगशाळा, वर्गकक्ष व इतर शैक्षणिक सोयी-सुविधांचे आधुनिकीकरण, अभ्यासक्रमात सुधारणा, डिजीटलायझेशन, नवनवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, संशोधनास चालना देणे, नवीन सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करणे व विद्यमान सेंटर ऑफ एक्सलन्सचे बळकटीकरण, इनोवेशनला आणि पेटंट्सला प्रोत्साहन देणे, संस्थांमध्ये प्रशासकीय सुधारणा म्हणजे व्यवस्थापन मंडळाची स्थापना, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाची स्थापना, शिक्षक वर्गाचे प्रशिक्षण, बहुशाखीय अभ्यासक्रम सुरु करण्यास अनुदान. यामुळे राज्यातील संस्थांना या अनुदानाचा उपयोग करून शैक्षणिक दर्जावाढ करण्यास मदत होणार आहे असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com