Publication of Multilingual Buddhist Encyclopedia at the University
बहुभाषिक बौद्ध संज्ञाकोशाचे विद्यापीठात प्रकाशन
पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पाली आणि बौद्ध अध्ययन विभाग आणि देशना बौद्ध विद्या तसेच संबंधित अध्ययन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या बौद्ध संज्ञाकोशाच्या दुसऱ्या व तिसऱ्या भागांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कोशात पाली, संस्कृत व तिबेटी बौद्ध संज्ञांचे त्यांच्या इंग्रजी अर्थासहित संकलन करण्यात आले आहे. आजवर केवळ पाली, संस्कृत किंवा तिबेटी भाषेचे वेगवेगळे कोश तयार झाले असले तरी या तिन्ही भाषांचा एकत्रित असा हा पहिलाच शब्दकोश आहे. विद्यापीठाच्या पाली आणि बौद्ध अध्ययन विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. महेश देवकर, संलग्न प्राध्यापक डॉ. लता महेश देवकर, डॉ. स्नेहल कोंढाळकर व महेश्वरसिंग नेगी यांच्या द्वारे हा प्रकल्प १ जून २०२० रोजी सुरू करण्यात आला. या प्रकल्पाकरता त्यांना ख्येन्चे फाऊंडेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेचे तसेच पुण्यातील देशना संस्थेचे आर्थिक सहकार्य लाभले आहे.
“बौद्ध अध्ययनाच्या क्षेत्रात काम करणारे विद्यार्थी आणि अभ्यासक यांच्यासाठी आणि विशेषतः विविध बौद्ध परंपरांचा तुलनात्मक अभ्यास करण्याऱ्या विद्वानांसाठी हा शब्दकोश उपयुक्त ठरेल” असा विश्वास या कोशाच्या संपादिका डॉ. लता देवकर यांनी व्यक्त केला.
कोशनिर्मितीचे काम अत्यंत जिकिरीचे असून प्रचंड ध्येयासक्तीशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही असे उद्गार कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर संशोधन संस्थेचे प्रकुलगुरू प्रा. डॉ. प्रसाद जोशी यांनी काढले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मराठी विश्वकोशाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजा दीक्षित यांनी या कोशाच्या दुसऱ्या व तिसऱ्या भागाचे प्रकाशन झाल्याचे जाहीर करून हा कोश म्हणजे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागाने बौद्ध अध्ययनाच्या क्षेत्राला दिलेले महत्त्वपूर्ण योगदान ठरेल असे गौरवोद्गार या प्रसंगी बोलताना काढले.
प्रा.दीक्षित यांनी या वेळी महाराष्ट्रातील कोशकार्याचा ऐतिहासिक मागोवा घेतला. विभागाशी संबंधित असलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विद्वानांच्या मदतीने हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण होईल आणि बहुभाषिक कोशांच्या क्षेत्रात एक मैलाचा दगड ठरेल अशी आशा त्यांनी या वेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर म्हणाले की डेक्कन कॉलेज, विद्यापीठातील पाली व बौद्ध अध्ययन विभागासारखे विभाग आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरासारख्या संस्था ज्या ठिकाणी आहेत अशा पुण्यात नव्या शैक्षणिक धोरणातील अनेक बाबींची पूर्तता करण्याची क्षमता आहे. ह्या कोशाच्या प्रकाशनाद्वारे पाली, संस्कृत व तिबेटी भाषेत दडलेले ज्ञान अभ्यासाच्या मुख्य प्रवाहात येईल आणि या प्राचीन भाषा तसेच बौद्ध तत्त्वज्ञान लोकांपुढे येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पाली व बौद्ध अध्ययन विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. महेश देवकर यांनी हा प्रकल्प सुमारे पन्नास भागांचा असणार असल्याची माहिती या वेळी दिली. भारतीय अभ्यासकांना हा कोश अधिकाधिक उपयुक्त ठरावा याकरता भविष्यात तो नागरी व तिबेटीलिपींमध्ये प्रकाशित करणार असल्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. त्याच बरोबर या कोशाचे हिंदी व मराठी रूपांतर देखील प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले.