Mumbai-Goa highway to be completed in one year: Union Minister Nitin Gadkari
मुंबई-गोवा महामार्गाचे काम एका वर्षात पूर्ण करणार-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते रायगडमध्ये 131.87 कोटी रुपयांच्या तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण आणि 430 कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पाचे आज भूमीपूजन
गड-किल्ल्यांच्या रोपवेसाठी महाराष्ट्रातून येणारे सर्व प्रस्ताव मंजूर करणार-नितीन गडकरी
मुंबई : आगामी एका वर्षाच्या आत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. गडकरी यांच्या हस्ते आज रायगड जिल्ह्यात 131.87 कोटी रुपयांच्या तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण आणि 430 कोटी रुपयांच्या 42 किलोमीटर मार्गासाठी भूमीपूजनाचा कार्यक्रम आज पार पडला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम एकूण 11 टप्प्यांमध्ये (पॉकेटस) सुरु आहे. सुरवातीच्या काळात भूमी अधिग्रहण, रेल्वे विभाग आणि वनविभागाच्या परवानग्या यामुळे कामाला उशीर झाल्याचे ते म्हणाले. मुंबई-गोवा ही ह्रदयवाहिनी आहे. त्यामुळे हे काम नक्कीच एक वर्षाच्या आत पूर्ण करु. हा महामार्ग आता केवळ मुंबई-गोवा नाही तर पुढे तो मंगलोरपर्यंत नेण्यात आला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर शासकीय जमीन उपलब्ध झाली तर लॉजिस्टीक पार्क आणि ट्रक टर्मिनल उभा करण्यास सर्वतोपरी मदत करु, असे गडकरी याप्रसंगी म्हणाले.
कोकणताली युवकांना मिळणाऱ्या रोजगाराच्या संधीबद्दल गडकरी यांनी सांगितले की, गेल्या सात वर्षात जेएनपीटीमध्ये एक लाख कोटी रुपयांची विकासकामे झाली आहेत. जेएनपीटीमध्ये 2016 मध्ये 570 कोटी रुपये खर्च करुन विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) सुरु करण्यात आले. त्यात आता 24 कंपन्या आलेल्या आहेत. या माध्यमातून 60 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक लवकरच येणार आहे. यामुळे कोकणातील दीड लाख युवकांना रोजगार मिळेल.
महाराष्ट्राला विशेषतः कोकणाला गड-किल्ल्यांचा मोठा वारसा लाभला आहे. त्यामुळे राज्यातील किल्ल्यासंदर्भात रोपवेसाठी जेवढे प्रस्ताव येतील तेवढे पूर्ण करु असे नितीन गडकरी म्हणाले. रोपवेसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे ऑस्ट्रीयन डॉफलवेअर तंत्रज्ञान उपलब्ध आहे, त्याचा राज्यात वापर करता येईल. तसेच सर्व किल्ल्यांवर लाईड अँड साऊंड शो ची व्यवस्था करण्याची त्यांनी सूचना केली.
आज लोकार्पण करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये दिघी बंदराला जोडणाऱ्या रसत्याचे काम पूर्ण झाले आहे. एमएसआरडीसीच्या सहकार्याने आज 131.87 किमी रस्त्याचे काम पूर्ण झाले असून त्यासाठी 1036.15 कोटी रुपये खर्च आला आहे. या रस्त्यामुळे माणगाव, मसाळा, दिघीपूर बंदर राष्ट्रीय मार्ग 753 F वर 54.750 किमी दुहेरी सिमेंट काँक्रीटचा रस्ता करण्यात आला आहे. यासाठी 457.52 कोटी रुपये खर्च आला आहे. इंदापूर, तळा, आगरदंडा राष्ट्रीय महामार्ग 548 A वर 42.345 किमी लांबीचा दुहेरी सिमेंट काँक्रीटचा रस्ता करण्यात आला आहे. यासाठी 355.17 कोटी रुपये खर्च आला आहे. पुणे-रायगड सीमेवर माणगावजवळ 36 किमी पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. यासाठी 223.46 कोटी रुपये खर्च आला आहे. या विकासकामांमुळे हरिहरेश्वर मंदिर, दिवेघरचे सुवर्ण मंदिर, मुरुड-जंजिरा किल्ला, पद्मदुर्गा किल्ला, श्रीवर्धन आणि दिवेघर सागरी किनाऱ्यांना चांगली रस्ते जोडणी मिळाली आहे.
आज पनवेल-इंदापूर राष्ट्रीय महामार्गावरील 42 किलोमीटरच्या रस्त्याचे भूमीपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.