Extension of deadline for NAC assessment registration for educational institutions
शैक्षणिक संस्थांना नॅक मुल्यांकन नोंदणीसाठी मुदतवाढ
– उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
नॅक मुल्यांकनबाबत येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी परीस स्पर्श योजना
मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने राज्यातील शैक्षणिक संस्थांना नवीन शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी नॅक मुल्यांकन करुन घेण्यासाठीची नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली.
शैक्षणिक संस्थांना नॅक मुल्यांकन प्रक्रियेतील अडीअडचणी सोडविण्यासाठी परिस स्पर्श योजना प्रस्तावित असल्याचेहीमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले
सदस्य कपिल पाटील यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना सभागृहात उपस्थित केली होती.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी माहिती देतांना सांगितले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाविद्यालयांनी नॅक मानांकन व मूल्यांकनाच्या प्रक्रियेत आपली गुणवत्ता राखणे, गुणवत्ता वाढ करणे अपेक्षित आहे. यासाठी शासनामार्फत सर्वोतोपरी मदत व प्रोत्साहन देण्यात येत आहे. तथापि सन 2010 पासुन वारंवार शासन स्तरावरून सूचना देऊनही शैक्षणिक संस्था याबाबत उदासीन दिसून येत आहेत. नुकतेच शासनाने पुढील सहा महिन्यात नॅक मूल्यांकन करून घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच वेळोवेळी विविध कार्यशाळा घेऊन नॅक मूल्यांकन नोंदणीसाठी प्रोत्साहीत करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
शैक्षणिक संस्थांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या जात आहेत. यासाठी परिस स्पर्श योजना प्रस्तावित असून 175 नॅक पात्र महाविद्यालयांना मेंटोर म्हणून निश्चित करण्यात आले आहे. या महाविद्यालयांद्वारे प्रत्येकी पाच महाविद्यालयांना नॅक मूल्यांकनासाठी मदत करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
उच्च शिक्षण विभागाचे संचालक यांनी नॅक मूल्यांकनासंदर्भात महाविद्यालयांना दिलेल्या सूचनामुळे कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com