NAC assessment will now be based on quality not quantity..!!
नॅक मुल्यांकन आता संख्येच्या नाही तर गुणवत्तेच्या आधारावर होणार..!!
डॉ.भूषण पटवर्धन: विद्यापीठात नॅक मुल्यांकन – संकल्पना , पद्धती या विषयावर परिसंवाद
पुणे : देशातील विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये यांचे मुल्यांकन करणाऱ्या राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या मूल्यमापन प्रक्रियेत अमुलाग्र बदल होणार असून पुढील काळात हे मुल्यांकन संख्येच्या नाही तर गुणवत्तेच्या आधारावर होणार आहे. ही बदलाची प्रक्रिया नॅकने सुरू केली असून सर्वांना त्यात सहभागी होण्याचे आवाहन देखील नॅककडून करण्यात आले आहे.
राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक) कार्यकारी समितीचे अध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राष्ट्रीय मुल्यांकन व मान्यता परिषद – संकल्पना , पद्धती’ या विषयावर एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुढील काळात नॅक समितीकडून चुकीच्या पद्धतीने काही पाकिटे घेऊन मुल्यांकन केल्याचे प्रकार समोर आले तर त्यावर गंभीर कारवाई केली जाईल.
डॉ. भूषण पटवर्धन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अंतर्गत गुणवत्ता कक्ष आणि कर्वे इन्स्टिट्युट ऑफ सोशल सर्विस यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या शैक्षणिक परिसंवादात नॅकचे अध्यक्ष डॉ भूषण पटवर्धन, आयसरचे माजी प्राध्यापक डॉ.के पी.मोहनन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.आर.एस. माळी, कर्वे इन्स्टिट्यूटचे मधुकर पाठक, संदीप खर्डेकर, धनंजय कुलकर्णी, एम.शिवकुमार, विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता आणि सिद्धता कक्षाच्या संचालिका डॉ.सुप्रिया पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षण हे मूल्यांवर आधारित असायला हवे हे आपल्या गुरू शिष्य परंपरेत सांगितले आहे. नव्या शैक्षणिक धोरणात मूलभूत शिक्षणावर भाष्य केले आहे, त्याचा अभ्यास करत शिक्षकांनी आपल्या पातळीवर त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात करावी.
डॉ.कारभारी काळे
डॉ.पटवर्धन म्हणाले, तुमच्या ग्रंथालयात किती पुस्तके आहेत, तुमच्याकडे किती ठिकाणी वायफाय सुविधा आहे असे प्रश्न आता मुल्यांकन प्रक्रियेत असणार नाहीत. या बदलात आम्ही सर्वांना सामावून घेत आहोत. आतापर्यंत ४७ वेळा मसुद्यात बदल करून आम्ही पुन्हा नव्या सूचनांसाठी संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने हे बदल होत असून यामध्ये शिक्षणाच्या मूळ उद्देशाच्या अनुषंगाने मुल्यांकन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यावेळी ‘वन नेशन वन डेटा’ बद्दलही त्यांनी भाष्य केले.
शिक्षकांनी पुस्तकातील शिक्षणाचा संदर्भ जगण्याशी जोडत आपली शिकवण्याची पद्धत निर्माण करावी. विद्यार्थ्यांचे शिक्षण हे अनुभव आधारित व रोजच्या जगण्याशी निगडित असावे, हेच शैक्षणिक धोरण २०२० मध्येही सांगितले आहे.
डॉ संजीव सोनवणे
तर प्राचार्यांच्या रोजगारासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. मोहनन म्हणाले, विद्यार्थ्यांना फक्त रोजगारासाठी तयार करणे हे उद्दिष्ट नसून परिस्थितीनुसार स्वतःला कायम तयार करू शकेल, बदलती परिस्थिती स्वीकारून स्वतःमध्ये बदल करेल असा विद्यार्थी आम्हाला या प्रक्रियेतून अपेक्षित आहे. यावेळी डॉ. मोहनन यांनी आपल्या शिक्षण व्यवस्थेतील मूलभूत बदलांबाबत भाष्य केले.
या शैक्षणिक परिसंवादात पुण्यातील विविध महाविद्यालयांचे नी प्राचार्य , महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता व्यवस्था समितीचे समन्वयक , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदाधिकारी व प्राध्यापक उपस्थित होते.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com