Pradhan Mantri National Apprenticeship Mela to be conducted in 200 locations across India
संपूर्ण भारतात 200 ठिकाणी पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण मेळावा आयोजित केला जाणार
उमेदवार प्रशिक्षण मेळावाद्वारे आजपर्यंत 67,035 शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण संधी उपलब्ध करून देण्यात आल्या
नोकरीच्या संधींना प्रोत्साहन देण्यासाठी मेळाव्यामध्ये 36+ उद्योग, 500+ व्यापार आणि 1000+ व्यवसायांचा समावेश असेल
नवी दिल्ली : करिअरच्या संधी आणि व्यावहारिक प्रशिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी, पंतप्रधान कौशल्य भारत अभियानाचा एक भाग म्हणून, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या वतीने 11 जुलै 2022 रोजी पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आतापर्यंत, 1,88,410 उमेदवारांनी शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण मेळाव्यात भाग घेतला आहे आणि आजपर्यंत 67,035 शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणाच्या संधी या मंचाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. एक दिवसीय मेळाव्यात 36 क्षेत्रे आणि 1,000 हून अधिक कंपन्या आणि 500 विविध प्रकारचे व्यवसाय सहभागी असणार आहेत. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय 200+ ठिकाणी हा मेळावा आयोजित करून, शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणाद्वारे उमेदवारांना त्यांच्या कारकिर्दीला आकार देण्याची संधी उपलब्ध करून देईल.
सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडे 5 वी-12वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, कौशल्य प्रशिक्षण प्रमाणपत्र, आयटीआय पदविका किंवा पदवीधर असणे आवश्यक आहे.शिवाय, तरुण आणि महत्त्वाकांक्षी मनुष्यबळाला वेल्डिंग, इलेक्ट्रिकल वर्क, हाउसकीपिंग, ब्युटीशियन, मेकॅनिक वर्क आणि बरेच 500+ व्यवसाय निवडता येतील. उमेदवारांना राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद (एनसीव्हीईटी)- मान्यताप्राप्त प्रमाणपत्रे देखील प्राप्त करता येतील, प्रशिक्षणानंतर त्यांची रोजगारक्षमता सुधारेल. प्रशिक्षण आणि व्यावहारिक कौशल्ये याद्वारे त्यांची क्षमता शोधण्यात आणि विकसित करण्यात नियोक्त्यांना सहाय्य्य करत असताना ,कंपन्यांना अधिक प्रशिक्षणार्थी नियुक्त करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या मेळाव्यामागील प्रमुख उद्देश आहे.
“आम्हाला आशा आहे की शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण मेळावा देशभरातील प्रतिभावान व्यक्तींना नोकरीच्या अतिरिक्त संधी उपलब्ध करून देईल.”, असे पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी मेळाव्याबद्दल आपले मत व्यक्त करताना, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले.
कौशल्य विकासाअंतर्गत शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण हे सर्वात शाश्वत मॉडेल आहे आणि कौशल्य भारत अंतर्गत मोठ्या प्रमाणात याला प्रोत्साहन मिळत आहे. राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण प्रोत्साहन योजना (एनएपीएस) अंतर्गत थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून (डीबीटी) अलीकडेच पहिल्या संचातील शिकाऊ प्रशिक्षणार्थी उमेदवारांना त्यांच्या खात्यात विद्यावेतन अनुदान प्राप्त झाले आहे.
पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण मेळाव्यामध्ये सहभागी कंपन्यांना संभाव्य शिकाऊ उमेदवारांना एकाच व्यासपीठावर भेटण्याची आणि प्रत्यक्ष स्थळी उमेदवार निवडण्याची संधी मिळणार आहे. शिवाय, किमान चार कर्मचारी असलेले लघु-उद्योग या मेळावादरम्यान शिकाऊ प्रशिक्षणार्थी उमेदवार नियुक्त करू शकतात.भविष्यातील शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी संकलित केलेले विविध श्रेयांक जोडणारी क्रेडिट बँक संकल्पना देखील लवकरच त्याचाशी जोडली जाणार आहे.
इच्छुक उमेदवार https://dgt.gov.in/appmela2022/ किंवा https://www.apprenticeshipindia.gov.in/ ला भेट देऊन मेळाव्यासाठी नोंदणी करू शकतात आणि मेळाव्याचे जवळचे ठिकाण शोधू शकतात.