National Seminar on Indian Cinema and Soft Power in Mumbai
सुप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या हस्ते मुंबईत ‘भारतीय चित्रपट आणि सुप्त सामर्थ्य’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन
भारतासह सर्व आशियायी देशांनी जागतिक पातळीवरील महत्त्वपूर्ण संस्कृती म्हणून स्थापित होण्यासाठी ही अत्यंत योग्य वेळ आहे : शेखर कपूर
मुंबई: चित्रपट माध्यमाच्या सुप्तशक्तींचा मागोवा घेणारा इंडीयन सिनेमा अँड सॉफ्ट पॉवर हा दोन दिवसांचा परिसंवाद मुंबईत आयोजित करण्यात आला आहे.
सुप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या हस्ते आज मुंबईत आयसीसीआर अर्थात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने आयोजित केलेल्या भारतीय चित्रपट आणि सुप्त सामर्थ्य या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन झाले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच आयसीसीआरचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांची मुंबईत राजभवन येथे झालेल्या उद्घाटन सोहोळ्याला उपस्थिती होती.
राज्यपाल यावेळी म्हणाले की, रामायण महाभारतासारख्या भारतीय महाकाव्यांमधल्या अनेक संकल्पना घेऊन विविध खेळ, किंवा चित्रपट, चित्रफिती बनवता येणं शक्य आहे.
भारतीय सिनेसृष्टी आता पाश्चात्य प्रभावाखालून बाहेर आली असून स्वतंत्रपणे फुलत आहे असं कपूर उद्घाटनपर भाषणात म्हणाले. तंत्रज्ञानाच्या आधुनिकीकरणाच्या गरजेवर भर देताना शेखर कपूर म्हणाले की, जर भारताला आपले सुप्त सामर्थ्य म्हणून चित्रपटाचा वापर करायचा असेल तर आपल्याला पुढच्या पिढीचे मन आणि हृदय जिंकून घ्यावे लागेल.
आज अमेरिकेतील 90 टक्के युवक सिनेमा किंवा इतर आभासी व्यासपीठांवरील निर्मिती पाहत नसून ते गेमिंग तसेच युट्युबवर निर्मित खासगी कथानक पाहत असल्याचे नमूद करून जगातील मोठा युवा देश असलेल्या भारताकरिता सध्याचा काळ ही आपले कथानक जगभर पोहोचविण्याची सुवर्ण संधी आहे.
युवकांमधील सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी त्यांना तंत्रज्ञान सक्षम करणे आवश्यक असल्याचे शेखर कपूर यांनी यावेळी सांगितले. भारताकडे जगाला सांगण्यासाठी फार मोठे कथानक असून त्याच्या प्रचार प्रसारासाठी आपण मार्ग शोधले पाहिजे असे ते म्हणाले.
आयसीसीआरचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे म्हणाले, “आज जगभरात भारतीय संस्कृतीबद्दल सद्भावना आणि आकर्षणाची भावना निर्माण झालेली दिसते पण आपल्याला त्यांच्यामध्ये भारताविषयी अधिक सखोल जाणीव निर्माण करण्याची गरज आहे आणि त्यासाठी चित्रपट हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे.”
ते पुढे म्हणाले की, गेल्या काही काळात आपल्याकडे तयार झालेले चित्रपट नकारात्मक बाजूवर अधिक प्रमाणात केंद्रित झालेले दिसतात; आपल्याला आपल्या संस्कृतीचे सकारात्मक पैलू देखील सर्वांसमोर आणायला हवेत.
भारतीय सांस्कृतिक संबंध मंडळ आणि फ्लेम विद्यापीठाने संयुक्तपणे हा परिसंवाद आयोजित केला असून उद्या माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत त्याचा समारोप होणार आहे.