प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेतील नूतन संकुलाचा सोमवारी लोकार्पण सोहळा

Dedication Ceremony of the new complex at the Regional Agricultural Extension Management Training Institute on Monday

प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेतील नूतन संकुलाचा सोमवारी लोकार्पण सोहळा

पुणे : हवेली तालुक्यात वडमुखवाडी (चऱ्होली) येथील प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत उभारण्यात आलेल्या प्रशिक्षण संकुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवार १६ मे २०२२ रोजी दुपारी २ वाजता करण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला  जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

रामेती पुणे संस्था वनामती नागपूर या राज्यस्तरीय शिखर संस्थेच्या अधिनस्त कार्यरत आहे. संस्था दौंड येथून पुणे येथे स्थलांतरीत करण्यात आली. पुणे येथे प्रशिक्षण हॉल व प्रशिक्षणार्थीची निवास व्यवस्था इत्यादीची गैरसोय होती. वडमुखवाडी ( चऱ्होली) येथील तालुका बिज गुणन केंद्राच्या मालकीच्या १२.३१ हेक्टर प्रक्षेत्रापैकी ६ हेक्टर क्षेत्र रामेती पुणे या संस्थेस देण्याचा निर्णय घेण्यात आला. रामेती पुणे संस्थेची सर्व अपेक्षीत बांधकामे पुर्ण झाली आहेत.

प्रक्षेत्रावर २१४५.२९ चौ.मी. क्षेत्रावर प्रशासकीय भवन उभारण्यात आले आहे. पहिल्या मजल्यावर एकूण ९ कक्ष असून, २ प्रशिक्षण सभागृह, ६ सिंडीकेट रूम १ ग्रंथालय आहे. दुसऱ्या मजल्यावर १ संगणक कक्ष, १ समिती सभागृह, सहाय्यक प्राध्यापक कक्ष, भांडार कक्ष, प्रदर्शन हॉल या प्रमाणे सुविधा आहेत. संगणक कक्षामध्ये सर्व संगणकांसाठी इंटरनेट सुविधा पुरविण्यात आली आहे. तसेच दोन्ही मजल्यांवरील कक्षांमध्ये देखील इंटरनेट सुविधा पुरविण्यात आली आहे.

प्रशिक्षण केंद्रावर २४२४.३० चौ. मी. क्षेत्रावर वसतिगृह इमारत असून प्रशिक्षणार्थीसाठी ३६ खोल्या आहेत. प्रत्येक खोलीमध्य ३ प्रशिक्षणार्थीकरीता निवास व्यवस्था करण्यात आली आहे. (१०८ प्रशिक्षणार्थी) तसेच २ हॉल असून सध्याचे प्रशिक्षणाचे लक्षांक विचारात घेता त्याचे रूपांतर प्रशिक्षण कक्षामध्ये करण्यात येत आहे. १ समिती सभागृह, भोजन कक्ष, योगा हॉल याप्रमाणे सुविधा उपलब्ध आहेत. प्रक्षेत्रावर ८० चौ.मी. क्षेत्रावर अधिकारी निवासस्थान बांधण्यात आले आहे.

प्रक्षेत्रावरील ३ हेक्टर क्षेत्रावर आंबा, पेरू, सिताफळ, आवळा, नारळ, चिक्कू इत्यादी फळझाडांच्या लागवडीसाठी प्लॉटस तयार करण्यात आले आहेत. तसेच फळबागेसाठी ठिबक सिंचन सुविधा निर्माण करण्यात आली आहे. माहे जून २०२२ मध्ये फळबाग लागवड करण्यात येणार आहे. या फळझाडांची लागवड आधुनिक तंत्रज्ञानानुसार करण्यात येणार असून त्याचा उपयोग प्रात्यक्षिक म्हणून प्रशिक्षणार्थीसाठी होणार आहे.

सदर संस्थेमार्फत कृषि विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचेसाठी प्रशासकीय व तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येतात. त्यामध्ये अहमदनगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यांचा अंतर्भाव आहे.

राज्य प्रशिक्षण धोरणाअंतर्गत इतर विभागांकरिता वर्ग २ व ३ या संवर्गाकरिता विविध विषयांवरील प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येतात. त्यामध्ये पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड व पालघर या जिल्ह्यांचा अंतर्भाव आहे.

या व्यतिरिक्त कृषि विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी राष्ट्रीय स्तरावरील संशोधन केंद्र व कृषि विद्यापिठे यांचेशी समन्वय साधून प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येते.

रामेती पुणे या संस्थेमार्फत भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण संस्थांसोबत करार करून काही विशेष प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेच्या प्राचार्यांनी दिली आहे.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

One Comment on “प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेतील नूतन संकुलाचा सोमवारी लोकार्पण सोहळा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *