Newly elected Speaker of the Legislative Assembly Rahul Narvekar will give equal justice to all – Chief Minister Eknath Shinde
विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विधानसभा अध्यक्षपदी बहुमताने निवड झाल्याबद्दल केले अभिनंदन
मुंबई: ॲड.राहुल नार्वेकर हे स्वतः कायद्याचे उत्तम जाणकार आहेत. कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता ते सदनातील सर्व सदस्यांना निश्चितच समान न्याय देतील असा विश्वास व्यक्त करून विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲड. राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड झाली त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात अभिनंदनाचा ठराव मांडला.तसेच विधान सभा अध्यक्षपदी श्री.नार्वेकर यांची निवड झाल्याने त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
हे ही वाचा
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर याची निवड.
आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांची बहुमताने अध्यक्षपदी निवड झाली.अध्यक्षपद निवडणुकीनंतर अभिनंदनाचा प्रस्ताव माडतांना मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या विधिमंडळाला मोठी परंपरा लाभलेली आहे. ज्यांनी ज्यांनी या अध्यक्ष पदावर कार्य केले आहे, त्यांना देशपातळीवर नावाजले गेले आहे म्हणून विधिमंडळात कायमच अध्यक्षांना एक वेगळे महत्व आणि मान राहिलेला आहे. तीच धुरा खांद्यावर पुढे घेऊन चालण्याची जबाबदारी आता ॲड. राहुल नार्वेकर यांच्या खांद्यावर आलेली आहे. ती नक्कीच पूर्ण क्षमतेने निभावून नेतील आणि सभागृहाची प्रतिष्ठा उंचाविण्याचे कार्य करतील.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ॲड. नार्वेकर हे राज्यातील आणि देशातील सर्वात तरूण अध्यक्ष आहेत.राष्ट्रकुल संसदीय मंडळाचा पुरस्कार प्राप्त ॲड. नार्वेकर हे कायद्यात निष्णात असल्याने या पदावरून न्यायदानाचे काम करतील. यापूर्वीच्या सर्व अध्यक्षांनी उत्तम काम केले असून हीच परंपरा ॲड. नार्वेकर यांच्या कालावधीत पुढे सुरू राहील. राज्याच्या सर्व नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची संधी त्यांना मिळाली असून
कोणत्याही अडचणी, प्रश्न सोडविण्याची क्षमता या सभागृहात आहे. त्यामुळे दोन्ही बाजू समजून घेऊन त्या विषयाला न्याय देण्याचे कार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करून ॲड. राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री.फडणवीस यांनी नवनियुक्त विधानसभा अध्यक्षांचे अभिनंदन केले.
या पदाला गौरवशाली परंपरा असून, ती कायम ठेवत ॲड. नार्वेकर यांच्या कार्यकाळात लोकहिताचे निर्णय घेऊन राज्याच्या विकासाला गती मिळेल, असे सांगून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ॲड. नार्वेकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही ॲड. नार्वेकर यांना शुभेच्छा देऊन सभागृहात राज्याच्या सर्व प्रश्नांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
याचबरोबर सदस्य सर्वश्री सुनील प्रभू, अबू आझमी, बच्चू कडू, सुधीर मुनगंटीवार, जयंत पाटील, नाना पटोले, आदित्य ठाकरे, दीपक केसरकर, हरिभाऊ बागडे, किशोर जोरगेवार, धनंजय मुंडे आदी सदस्यांनीही ॲड.नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com