Nitin Gadkari advises sugar mills to switch to ethanol production instead of sugarcane production
ऊसापासून साखर निर्मितीऐवजी इथेनॉल निर्मितीकडे वळण्याचा नितीन गडकरी यांचा साखर कारखान्यांना सल्ला
मुंबई : ऊसापासून साखर निर्मिती कमी करून इथेनॉल निर्मितीकडे वळण्याची वेळ आली असल्याचं केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत राष्ट्रीय कॉनजनरेशन पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.
सरकारनं पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतलेला आहे, इथेनॉलची गरज मोठ्या प्रमाणावर वाढली असून गेल्या वर्षी देशाची इथेनॉल उत्पादन क्षमता ४०० कोटी लिटर एवढी होती, अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली.
केंद्र सरकारनं कृषी उद्योगा बरोबरच वीज आणि ऊर्जा क्षेत्रावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. वीज खरेदीसाठी दरांचं सुसूत्रीकरण करणं आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या धोरणांच्या अनुषंगानं काही राज्य आपली दर निश्चिती करत नसल्याकडे गडकरी यांनी यावेळी लक्ष वेधलं.
मुंबईत अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दीक्षांत समारंभालाही गडकरी उपस्थित होते. ज्ञानाचं रूपांतर अभिनवतेत करणं म्हणजे देशाच्या संपत्तीत वाढ करण्यासारखं आहे, अनेकदा महानगरपालिकांच्या कामकाजात गुणवत्तेचा आणि दर्जाचा अभाव जाणवतो, त्यावर उपाय म्हणून आपल्याला उत्कृष्ट आणि प्रगत तंत्रज्ञान तसंच प्रकल्प व्यवस्थापनाची आवश्यकता आहे, असं गडकरी म्हणाले.
आगामी काळात तंत्रज्ञानाचा वापर करून स्थानिक स्वराज्य संस्थांचं आर्थिक सक्षमीकरण आवश्यक असल्याचं गडकरी म्हणाले. भविष्यात सामाजिक स्तरावर केलं जाणारं प्रत्येक काम दर्जेदार व्हावं यासाठी सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना तसं प्रशिक्षण द्यायला हवं, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “ऊसापासून साखर निर्मितीऐवजी इथेनॉल निर्मितीकडे वळण्याचा नितीन गडकरी यांचा साखर कारखान्यांना सल्ला”