Instructions to the administration to be vigilant against the backdrop of the increasing number of corona victims in Mumbai
राज्यात आज कोरोनाच्या हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद
मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेला दक्ष राहण्याचे निर्देश
मुंबई : मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेला दक्ष राहण्याचे निर्देश पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
मुंबईत कोविड लसीकरण व्यापक स्तरावर झालं असलं तरी गाफील न राहता काळजी घेणं आवश्यक आहे. तसंच पावसाळा सुरु होण्याच्या बेतात असल्यानं रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा आणि सर्व संबंधित खाती, विभाग यांना दक्ष राहावं, कोविड चाचण्या युद्धपातळीवर वाढवाव्यात, १२ ते १८ वर्षे वयोगटातल्या मुला-मुलींच्या लसीकरणाला वेग द्यावा, तसंच वर्धक मात्रा घेण्यासाठी पात्र नागरिकांना प्रवृत्त करावं, जम्बो कोविड रुग्णालयांनी सतर्क राहावं, सर्व सहायक आयुक्तांनी आपापल्या विभागात दैनंदिन कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, पर्जन्य जल उदंचन यंत्रणा, अग्निशमन उपाययोजना, वैद्यकीय आणि निमवैद्यकीय कर्मचारी, औषधसाठा आणि वैद्यकीय सामुग्री, वैद्यकीय प्राणवायू, इत्यादी सर्व बाबी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत आणि त्या सुस्थितीत कार्यान्वित आहेत, याची खातरजमा करावी, असं आयुक्तांनी आपल्या निर्देशांमध्ये नमूद केलं आहे.
राज्यात आज कोरोनाच्या हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद
राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी कोविड-१९ दैनदिन रुग्णसंख्येत मोठी झाली. आज १ हजार ८१ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ५२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या राज्यात ४ हजार ३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी सर्वाधिक २ हजार ९७० रुग्ण मुंबईत आहेत. त्याखालोखाल ४५२ रुग्ण ठाण्यात, तर ३५७ रुग्ण पुण्यात आहेत.राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७ शतांश टक्के, तर मृत्यूदर १ पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे.
हर घर दस्तक मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात
केंद्र सरकारनं आजपासून घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या हर घर दस्तक मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली. याअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीची मात्रा दिली जाणार आहे. हर घर दस्तक मोहीम ३१ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. या लसीकरण मोहिमेद्वारे दुसरी मात्रा आणि वर्धक मात्रेच्या पात्र लाभार्थ्यांच्या लसीकरणावर भर दिला जाणार असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
संपूर्ण लसीकरण सुनिश्चित करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हर घर दस्तक मोहीम सुरू करण्याची घोषणा केली होती. मुंबई महापालिकेनंही शहरातल्या विविध पर्यटनस्थळी लसीकरणाला सुरुवात केली आहे.
लसीकरण मोहिमेत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९३ कोटी ५३ लाखाच्या वर
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९३ कोटी ५३ लाखाच्या वर गेली आहे.
त्यात ८८ कोटी ९६ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन, तर ३ कोटी ४१ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना १० कोटी ५३ लाखापेक्षा जास्त, तर १२ ते १४ या वयोगटातल्या लाभार्थ्यांना ५ कोटी ८ लाखापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत.
आज सकाळपासून ७ लाखापेक्षा नागरिकांचं लसीकरण झालं आहे.राज्यात आज सकाळपासून ३८ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं.
राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १६ कोटी ६८ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ७ कोटी ३५ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा, तर २७ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली.
१५ ते १८ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना ६६ लाख ७१ हजारापेक्षा जास्त, तर १२ ते १४ या वयोगटातल्या लाभार्थ्यांना ३२ लाख १३ हजारापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत.
हडपसर न्युज ब्युरो