Govt serious about increasing complaints of obscene content (views) on OTT: Anurag Thakur
ओटीटी वर अश्लील कंटेटच्या (दृश्यांच्या) वाढत्या तक्रारींविषयी सरकार गंभीर
– केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर
सर्जनशीलतेच्या नावाखाली, शिवीगाळ आणि असभ्यपणा सहन केला जाणार नाही
नागपूर: ओटीटी प्लॅटफॉर्मवर वाढती अश्लीलता आणि असभ्य शिवीगाळ याबद्दल आलेल्या तक्रारींची सरकारने गंभीर दखल घेतली आहे, अशी माहिती, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. ते आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
“सर्जनशीलतेच्या नावाखाली जर कोणी शिवीगाळ करत असेल तर ते सहन केले जाणार नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मवर वाढती शिवीगाळ आणि अश्लील दृश्याविषयी येणाऱ्या तक्रारींबद्दल सरकार गंभीर आहे. जर यासाठी नियमात काही बदल करण्याची गरज भासली तर मंत्रालय त्या दिशेनेही विचार करेल. कारण या प्लॅटफॉर्मना सर्जनशीलते साठी स्वातंत्र्य देण्यात आले होते, शिवीगाळ आणि अश्लीलतेसाठी नाही. आणि जर कोणी ही मर्यादा ओलांडली, तर सर्जनशीलतेच्या नावाखाली, असभ्य शिवीगाळ स्वीकारली जाणार नाही. यावर काही कारवाई करण्याची गरज पडली तर सरकार मागे हटणार नाही” असेही अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले.
सध्या जी प्रक्रिया सुरु आहे, त्यानुसार, आधी प्राथमिक पातळीवर, निर्मात्यांना त्यांच्या तक्रारींचे निवारण करावे लागते. त्यांच्या वर्तनात बदल करुन, ते 90 ते 95 टक्के तक्रारी दूर करु शकतात. त्यानंतर संघटनेच्या पातळीवर देखील या तक्रारींचे निवारण केले जाते, जास्तीत जास्त तक्रारी तिथेच निरस्त केल्या जातात.
त्यापुढे, जेव्हा सरकारच्या पातळीवर गोष्टी होतात, तेव्हा विभागीय समितीच्या पातळीवर, त्यात कठोर कारवाईचे जे नियम आहेत, त्यानुसार आम्ही कारवाई करतो. मात्र गेल्या काही काळापासून, या तक्रारी वाढण्यास सुरुवात झाली आहे आणि आमचा विभाग अत्यंत गांभीर्याने त्याकडे बघतो आहे.आम्हाला या नियमावलीत बदल करायचं असेल, तर त्याबद्दलही आम्ही गांभीर्याने विचार करतो आहोत.
देशात मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असलेल्या पायाभूत सुविधांमुळे सामान्य नागरिकांच्या वेळेची आणि पैशाची बचत होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. आगामी काळातही देशात नवीन विमानतळ ,मेट्रो, अत्याधुनिक रेल्वेगाड्या यां सारख्या पायाभूत सुविधांच्या विकासाकरता यावर्षीच्या अर्थसंकल्पात १० लाख कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
हायड्रोजन फ्युचर फ्युएल, इथेनॉल पेट्रोलचे मिश्रण अशा पर्यायातून पर्यावरणाची काळजी घेत केंद्र सरकारची वाटचाल सुरु आहे असं ठाकूर म्हणाले. नागपूरमध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रकल्पाला लागणाऱ्या जमिनीच्या मोठ्या भागात असलेलं अतिक्रमण हटवून सुसज्ज असं क्रीडा संकुल तयार करण्याचे निर्देश आपण प्रशासनाला दिल्याचं अनुराग ठाकूर यांनी सांगितलं.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com