On-job training and internship facilities will be provided to the students
विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग आणि इंटर्नशिप सुविधा उपलब्ध करून देणार – मंत्री मंगलप्रभात लोढा
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठांसोबत १२ उद्योग समूहांनी केले सामंजस्य करार
विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण, ऑन जॉब ट्रेनिंग आणि इंटर्नशिप सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील
जागतिक दर्जाच्या शिक्षणातून रोजगाराच्या संधी
मुंबई : “महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठांसोबत १२ उद्योग समूहांनी सामंजस्य करार केल्यामुळे कौशल्य पूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ पासून विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण, ऑन जॉब ट्रेनिंग आणि इंटर्नशिप सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील” अशी ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे विविध उद्योगसमूहांशी सामंजस्य करार मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील दालनात आज झाले, त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री श्री.लोढा म्हणाले की, उद्योजकता आणि नाविन्यता विद्यार्थ्यांमध्ये रुजवावी यामुळ उद्देशाने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची स्थापना केली असून, हे विद्यापीठ सातत्याने प्रगती करीत आहे. पाच कौशल्य प्रशाला, एकवीस नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी शासन अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. याच माध्यमातून अनेक उद्योगसमूहाशी सामंजस्य करार देखील करण्यात आले आहेत. संस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून शैक्षणिक वर्ष २०२३- २४ पासून विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण, ऑन जॉब ट्रेनिंग आणि इंटर्नशिप सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मंत्री श्री. लोढा म्हणाले की, जागतिक दर्जाच्या शिक्षणातून अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. यासाठी या सर्व उद्योगसमूहांचे सहकार्य मिळेल. मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना अशाप्रकारे प्रशिक्षित करून देशात आणि परदेशातही उत्तम पगाराच्या नोकऱ्या मिळतील. डिजिटल व्हिडिओ प्लॅटफॉर्म, विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान शिकवणे यातून कौशल्ययुक्त विद्यार्थी घडण्यास मदत होणार असल्याने, या सर्व उद्योगसमूहांचे त्यांनी आभार मानले.
जागतिक दर्जाच्या शिक्षणातून रोजगाराच्या संधी – अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक
अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या की, भारत हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश असून, यामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. शिक्षण घेणारा तरुण हा कौशल्ययुक्त असावा यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. आरोग्य, हॉटेल, औद्योगिक क्षेत्र, आयटी क्षेत्र यामध्ये उच्च तंत्रज्ञान आत्मसात केलेल्या कुशल मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याचे लक्षात घेऊन शासनाने आज विविध बारा उद्योग समूहांशी सामंजस्य करार केले आहेत. या सामंजस्य कराराच्या उद्योग क्षेत्राला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ मिळण्यासाठी मदत होईल.
यावेळी कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, यासह सॅप इंडिया, रेडहंट, मायक्रोसॉफ्ट, सेर्टी पोर्ट ,एमईडीसी, मॅक, एनआरएआय, संचेती, सीएसडीसीआय यासह विविध उद्योगसमूहांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com