Online courses in Sanskrit language by Bhandarkar Institute
भांडारकर संस्थेतर्फे संस्कृत भाषेचे ऑनलाईन कोर्सेस
पुणे : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या वतीने येत्या जूनपासून संस्कृत भाषेच्या ऑनलाइन कोर्सेसचे आयोजन करण्यात आले असल्याची घोषणा आज भांडारकर संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. भूपाल पटवर्धन, वसंत कोठारी फाऊंडेशनचे श्री. राज कोठारी व श्री. अशोक कोठारी यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
या कोर्सेससाठी वसंत कोठारी फाऊंडेशनने अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले आहे.
सदरचा वर्ग लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना मोफत असणार आहे. 30 मिनिटांचे गाणी, संवाद, छोटे ॲनिमेटेड स्वरूपाचे व्हीडिओज असतील. एकूण 120 व्हीडिओजचा हा कोर्स असणार आहे.
संस्कृत ही भारताची मूळ भाषा आहे. वसंत कोठारी फाऊंडेशन संस्कृत भाषेचा प्रसार आणि प्रचार सर्वदूर नीट व्हावा यासाठी विविध संस्थांना मिळून 5 कोटी रुपये देणगी स्वरूपात देणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये भांडारकर संस्थेला या प्रकल्पासाठी रु. 50 लाख देणगी देण्याचे त्यांनी आज जाहीर केले.
सदरच्या संस्कृत वर्गाचा अभ्यासक्रम हा वर्णमालेपासून सुरू हून दैनंदिन जीवनातील संभाषणापर्यंत राहणार आहे. संस्कृत भाषेची अवाजवी भीती घालवणे हाही या वर्गाचा उद्देश आहे.
भांडारकर संस्थेत संस्कृत भाषेचे अद्ययावत वर्ग म्हणजेच व्याकरणासाहित वर्ग सुरू आहेतच. या कोर्स ऑनलाइन असल्यामुळे भारतातच नव्हे तर जगात कोठूनही हा वर्ग करता येणार आहे. या कोर्समध्ये सध्या संस्कृत भाषा समजावून सांगण्याचे माध्यम इंग्रजीत ठेवण्यात आले आहे, मात्र भारतातील अन्य ज्या प्रादेशिक भाषा आहेत त्याची सबटायटल्स त्या व्हीडिओजला असण्याचा प्रयत्न देखील केला जाणार आहे.
अत्यंत सोप्या पद्धतीने हसत खेळत संस्कृत शिकण्याचा हा कोर्स आहे. पुण्यातील डेक्कन कॉलेज, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, कॅम्प एज्युकेशनची शाळा, भारत इतिहास संशोधक मंडळ अशा विविध संस्थाना तसेच महाराष्ट्र व भारतातील अन्य महत्त्वाच्या राज्यांमध्ये देखील वेदाध्ययन व संस्कृत भाषेचा प्रसार, अभ्यास करण्यासाठी वसंत कोठारी फाऊंडेशनतर्फे आर्थिक मदत दिली जाणार आहे.
या संस्कृत कोर्ससाठी भांडारकर संस्थेच्या www.borilib.com या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. या वर्गासाठी सध्या कोणतीही परीक्षा असणार नाही. या पत्रकार परिषदेला संस्थेचे मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन, विश्वस्त प्रदीपदादा रावत, विश्वस्त प्रदीप आपटे, डॉ. श्रीनन्द बापट आदी उपस्थित होते.
हडपसर न्युज ब्युरो