Only admit an accredited business training institute to prevent fraud
फसवणूक टाळण्यासाठी मान्यता प्राप्त व्यवसाय प्रशिक्षण संस्थेतच प्रवेश घ्या
विद्यार्थ्यांनी प्रवेशावेळी व्यवसाय प्रशिक्षण संस्थेला मान्यता असल्याची खात्री करावी
पुणे : इयत्ता १० वी व १२ वी नंतर कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या व्यवसाय अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना फसवणूक टाळण्यासाठी हे अभ्यासक्रम राबवणाऱ्या संस्थेला विभागाची मान्यता असल्याबाबतची खात्री करूनच प्रवेश घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत राबवण्यात येणारे व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रम, पूर्व व्यवसायिक अभ्यासक्रम, अधिक २ स्तरावरील द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम , अधिक २ स्तरावरील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमामार्फत राबविण्यात येणारे अभ्यासक्रम व महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळामार्फत राबविण्यात येणारे प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्यात येतात.
दहावी, बारावी परीक्षांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थी तसेच तत्सम शाखेतील विद्यार्थी विविध व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेत असतात. विद्यार्थ्यांनी त्यांची फसवणूक होऊ नये व आर्थिक व शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रवेश घेत असलेल्या संस्थेस कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाची मान्यता मिळालेली असल्याबाबत खात्री करुनच प्रवेश घ्यावा.
संबंधित मान्यता प्राप्त संस्थेबाबत अधिक माहितीसाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, घोले रस्ता, पुणे-५ या कार्यालयाशी संपर्क साधावा. (दुरध्वनी क्र. ०२०-२९५१३८१७, ईमेल आयडी dveto.pune@dvet.gov.in वेब साईट https://www.dvet.gov.in ) असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी बी.आर.शिंपले यांनी केले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “फसवणूक टाळण्यासाठी मान्यता प्राप्त व्यवसाय प्रशिक्षण संस्थेतच प्रवेश घ्या”