Opportunity to earn money along with education for all B. Voc students
बी.व्होक च्या सर्व विद्यार्थ्यांना ‘शिक्षणासोबच अर्थार्जनाची संधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: ‘लेटर ऑफ इंटर्नशिप ‘ प्रदान
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘बी.व्होक. इन रिटेल मॅनेमेंट’ च्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना बुधवारी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांच्या हस्ते ‘लेटर ऑफ इंटर्नशिप ‘ प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या वेळी विद्यापीठातील अधिष्ठाता व कौशल्य विकास केंद्राचे संचालक डॉ.पराग काळकर, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक व अधिष्ठाता डॉ.दीपक माने, कौशल्य विकास केंद्रातील प्राध्यापक व अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ.रवी आहुजा यांच्यासह अनेक शोरुमचे डीलर उपस्थित होते.
कोव्हिड काळात अनेकांच्या हाताला रोजगार नव्हता, अश्यातच शिकत शिकत विद्यार्थ्यांना काम करता यावे व त्यांचा कौशल्य विकास व्हावा यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मारुती सुझुकी इंडिया लिमटेड सोबत सामंजस्य करार करत नवीन ‘बी व्होक इन रिटेल मॅनेजमेंट’ हा अभ्यासक्रम २०२१-२२ पासून सुरू केला आहे. त्याअंतर्गत आज विद्यार्थ्यांना आता शिकत शिकत काम करून अर्थार्जन करण्याची संधी मिळाली आहे.
‘बी.व्होक इन रिटेल मॅनेजेंट’ या अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅच मधील सर्वच्या सर्व २३ विद्यार्थ्यांना ही संधी मिळाली आहे. या पदवी अभ्यासक्रमांतर्गत पहिल्या वर्षी पूर्णवेळ वर्गात तर दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी काम करत शिकण्याची संधी देण्यात आली आहे. यामध्ये त्यांना महिना ८ हजार रुपये त्यासोबतच भत्ताही देण्यात येणार असल्याचे कौशल्य विकास केंद्रातील प्राध्यापक डॉ.आहुजा यांनी सांगितले. तसेच तिसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांना ९ हजार रुपये व भत्ता देण्यात येणार असल्याचेही डॉ.आहुजा यांनी सांगितले.
यंदाच्या वर्षीची बी.व्होक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून याबाबतची सर्व माहिती विद्यापीठाच्या www.unipune.ac.in या संकेस्थळावर देण्यात आली आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com