‘Orange Alert’ for Mumbai and surrounding districts today and tomorrow
मुंबई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या ‘ऑरेंज अलर्ट’
मुंबई: राज्यात मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात मान्सून सक्रिय झाला आहे. हवामान विभागानं मुंबई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कोकण आणि विदर्भात काल मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणीही पाऊस झाला. येत्या दोन दिवसात कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर दक्षिण महाराष्ट्र किनाऱ्यावर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे. विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलं.काल रात्रीपासून नवी मुंबई परिसरात देखील पावसानं जोरदार हजेरी लावली.
सकाळी साडेआठपासून दुपारी साडेबारापर्यंत अकरा पूर्णांक तेरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर वाढल्यानं शहरात दोन ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. पालघर जिल्ह्यात सर्वत्र आज सकाळपासून जोरदार पावसानं हजेरी लावली.
पालघर, बोईसर, धनानीनगर या भागांत जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात भात पेरणीला अनुकूल असं वातावरण तयार होत असून वातावरणातली उष्णता कमी झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
बुलडाणा जिल्ह्यात काही भागात काल रात्री मुसळधार पाऊस पडला तर आज सकाळीही जिल्ह्यातल्या खामगाव, चिखली, बुलढाणा, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, मेहकर, लोणार, संग्रामपूर तालुक्यात पाऊस पडला.
काही तालुक्यात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. अनेक भागात कपाशी ची पेरणी झाली असून काही भागात पावसामुळे शेतकर्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. धुळे शहरासह ग्रामीण भागात ढगाळ वातावरण आहे, धुळे तालक्यातील काही ठिकाणी आज तुरळक पाऊस झाला.
हडपसर न्युज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com