Organization of national workshops based on the concept of ‘Clean and Green Village’ and ‘Jalsamriddha Gaon’
‘स्वच्छ व हरित ग्राम’ आणि ‘जलसमृद्ध गाव’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन
पुणे : भारत सरकारचे ग्रामविकास व पंचायती राज मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाचा ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ व हरित ग्राम’ व ‘जलसमृद्ध गाव’ या शाश्वत समान विकास ध्येयावर आधारित राष्ट्रीय कार्यशाळेचे २२ ते २४ सप्टेंबर या कालावधीत पिंपरी-चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यशाळेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, लोकप्रतिनिधी, केंद्र व राज्य शासनातील विविध विभागाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
केंद्र शासनाने निश्चित केलेल्या ९ संकल्पनांपैकी ‘स्वच्छ व हरित ग्राम’ आणि ‘जल समृद्ध गाव’ या दोन संकल्पनांवर आधारित राष्ट्रीय कार्यशाळा घेण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्यावर सोपविण्यात आल्याने राज्यात शाश्वत विकास ध्येयाचे स्थानिकीकरण या विषयासंबंधीच्या दृष्टीकोनावर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यशाळेकरीता राज्यातून अंदाजे एक हजार तसेच इतर राज्ये व केंद्र शासित प्रदेशामधून जवळपास पाचशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे व मोबाईल अॅप, तीन माहितीपर पुस्तके यांचे विमोचन करण्यात येणार आहे. दोन संकल्पानांवर आधारीत तांत्रिक व्याख्याने, पाच पॅनेल चर्चा आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. या पॅनेल चर्चामध्ये राज्यासह इतर राज्याचे सरपंच त्यांच्या गावची यशोगाथा मांडणार आहेत. पॅनेलचे सदस्य त्यांच्याबरोबर गावाच्या प्रगतीबाबत चर्चा करणार आहेत. २२ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा कार्यक्रम सादर केला जाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त राहुल साकोरे यांनी दिली आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com