Veteran playback singer Padmashri Sulochana Chavan passed away at old age.
महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री सुलोचना चव्हाण यांचं वृद्धापकाळानं निधन
मुंबई : लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचं आज मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं. त्या ८९ वर्षांच्या होत्या. सांस्कृतिक क्षेत्रात सुलोचना चव्हाण यांचं मोलाचं योगदान आहे.
सुलोचना चव्हाण यांनी त्यांच्या आवाजानं रसिक प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. मराठी लोककलेचं वैशिष्ट्य असणाऱ्या लावणीमध्ये तर त्यांनी श्वासच फुंकला. लावणीची नजाकत त्यांनी आपल्या सुरांनी जिवंत केली. त्यामुळंच तमाशा फडातली ही लावणी घराघरात आणि मनामनापर्यंत पोहचली.
पार्श्वगायनासह, लावणीचे विविध प्रकार त्यांनी खुलवून सादर करत रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं. कसं काय पाटील बर हाय का?, पाडाला पिकलाय आंबा, मला म्हणत्यात पुण्याची मैना, तुझ्या उसाला लागला कोल्हा, अशा एकापेक्षा एक ठसकेबाज लावण्या त्यांनी गायल्या आहेत.
ही गाणी खूप लोकप्रिय ठरली आणि आज देखील त्या गाण्यांची जादू अबाधित आहे. आपल्या कारकिर्दीत सुलोचना ताईनी मराठी व्यतिरिक्त हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामीळ, पंजाबी या भाषांमध्ये देखील अनेक गाणी गायली आहेत.
सांस्कृतिक क्षेत्रातल्या त्यांच्या समृध्द कारकिर्दीबद्दल सुलोचना चव्हाण यांना गंगा-जमना पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे दोन जीवनगौरव पुरस्कार, पुणे महापालिकेतर्फे सन २००९ चा राम कदम पुरस्कार, सन २०११ चा महाराष्ट्र सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार अशा पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.
याचवर्षी त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. आज संध्याकाळी मुंबईतल्या मरीन लाईन्स इथल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
सुलोचना चव्हाण यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि कला क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मराठी लोककलेचं लावण्य असणाऱ्या लावणीला घराघरांत आणि मनामनात पोहचवणाऱ्या सूरसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या लावणीची ओळख सांगणारा आवाज शांत झाला आहे”,अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायिका, लावणी सम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, “ महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्रासाठी ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांचा आवाज एक मोठा ठेवा आहे. त्यांना आवाजाचे वरदानच मिळाले होते. या आवाजाची ताकद ओळखून त्यांनी आपल्या प्रतिभेने आणि कलासाधनेतून अनेक गाणी अजरामर केली.
मराठी लोककलेचं वैशिष्ट्य असणाऱ्या लावणीमध्ये तर त्यांनी श्वासच फुंकला. लावणीची नजाकत त्यांनी आपल्या सुरांनी जिवंत केली. त्यामुळंच तमाशा फडातील ही लावणी घऱाघरात आणि मनामनापर्यंत पोहचली. पार्श्वगायनासह, लावणीचे विविध प्रकार त्यांनी खुलवून सादर करत रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले.
त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून उमेदीच्या काळात विविध कारणांसाठी निधी उभारणीकरिता जाहीर कार्यक्रम केल्याची उदाहरणे आजही दिली जातात. अशा लोककलेशी आणि समाजाशी एकरूप, सहृदय महान कलावंताचे निधन हे महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्राची हानी आहे. ज्येष्ठ गायिका, लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
विरोधी पक्षनेते अजित पवार
“ज्येष्ठ पार्श्वगायिका, लावणीसम्राज्ञी सुलोचनाताई चव्हाण यांचं निधन हे महाराष्ट्राच्या कला, सांस्कृतिक विश्वासाठी धक्का आहे. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या लोककला, लोकसंगीतातील दैदिप्यमान युगाचा अंत झाला आहे, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
तर लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचनाताई चव्हाण यांच्या निधनाने लावणीचा अभिजात सूर हरपल्याची शोक भावना सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
बैठकीची लावणी किती समृद्ध असावी याचा वस्तुपाठ सुलोचनाताईंनी घालून दिला होता. अनेक तमाशाप्रधान चित्रपटातून त्यांनी ठसकेबाज स्वरात लावण्या सादर केल्या. चपळ, फटकेबाज शब्दांना आपल्या आवाजाच्या, सुरांच्या माध्यमातून ठसका व खटका देण्याचे काम सुलोचनाताईं इतके कोणीही उत्तम करू शकलेले नाही. पाठीमागे अंतरे कसेही असोत पण लावणीच्या मुखड्याची सुरूवात ठसकेबाजच झाली पाहिजे, असे सुलोचनाताईंचे ठाम मत होते आणि याचा प्रत्यय त्यांनी गायलेल्या लावण्यांतून येतोच.
सुलोचनाताई लावणीचे चालते-बोलते विद्यापीठ होते. शास्त्रीय गायकीचे कोणतेही विधीवत शिक्षण न घेता दीर्घकाळ त्यांनी लावणीच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर उमटविलेला ठसा कधीही विसरू शकणार नाही. त्यांनी गायलेल्या लावण्यांनी जनमानसाच्या हृदयात मानाचे स्थान मिळविले आहे.
लावणीला राजमान्यता, लोकमान्यता व प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या सुलोचनाताईंच्या निधनाने या क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोक संदेशात म्हटले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com