Pakistan-based Abdul Rahman Makki has been declared a global terrorist
पाकिस्तानस्थित अब्दुल रहमान मक्की जागतिक दहशतवादी घोषित
अब्दुल रहमान मक्की याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत मंजूर
नवी दिल्ली :: संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने पाकिस्तानस्थित दहशतवादी अब्दुल रहमान मक्की याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे. लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि २६/११ हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा तो जवळचा नातलग आहे.
पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबाच्या उपप्रमुखाला काळ्या यादीत टाकण्याच्या भारत-अमेरिकेच्या संयुक्त प्रस्तावावर चीनने नकाराधिकार मागेघेतल्या नंतर अब्दुल रहमान मक्की याला संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी घोषित केल्याने भारताचा एक मोठा राजनैतिक विजय झाला.
भारतात, विशेषतः जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी तरुणांची भरती करणं आणि दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवणं या कामात मक्कीचा हात होता; त्यामुळे भारत आणि अमेरिकेने याआधीच त्याला दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे.
यापूर्वीच मक्कीला दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव भारतातर्फे सुरक्षा परिषदेत मांडण्यात आला होता. त्यावेळी चीनने नकाराधिकाराचा वापर करुन प्रस्ताव रोखला होता. मात्र आता एकूण १५ सदस्यांपैकी १४ सदस्यांनी भारताची बाजू घेतल्यानं चीनला नकाराधिकार मागे घ्यावा लागला.
मंजुरी समितीने म्हटले आहे की, मक्कीने एलईटी आणि जेयूडीमध्ये नेतृत्वाची पदे भूषवली असताना, एलईटी प्रमुख हल्ल्यांसाठी जबाबदार आहे किंवा त्यात त्यांचा सहभाग होता. या मध्ये लाल किल्ल्यावरील हल्ल्याचाही समावेश आहे ज्यात 22 डिसेंबर 2000 रोजी सहा दहशतवाद्यांनी लाल किल्ल्यावर हल्ला केला आणि उपस्थित सुरक्षा दलांवर अंदाधुंद गोळीबार केला.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com