Pakistan beat New Zealand to reach finals
पाकिस्तानने न्यूझीलंडला नमवून अंतिम फेरी गाठली
T-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पाकिस्ताननं न्यूझीलंडचा पराभव केला
उपांत्य फेरीचा दुसरा सामना उद्या भारत आणि इंग्लंड संघांदरम्यान होणार
सिडनी : T-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज पाकिस्ताननं न्यूझीलंडचा सात गडी आणि पाच चेंडू राखून पराभव केला आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.
न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ४ बाद १५२ धावा केल्या. न्यूझीलंडच्या मिशेलनं ३५ चेंडूत नाबाद ५३ धावा फटकवून डावाला आकार दिला. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेल ५३आणि केन विल्यमसन ४६ यांनी सर्वाधिक धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने २ तर मोहम्मद नवाजने एक विकेट घेतली.
१५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने १९.१ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात धावा केल्या.
पाकिस्तानची सलामीची जोडी कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी करत पाकिस्तानचा विजय निश्चित केला. ४३ चेंडूत ५७ धावा करणाऱ्या रिझवानला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
उपांत्य फेरीचा दुसरा सामना उद्या भारत आणि इंग्लंड संघांदरम्यान होणार आहे. या सामन्यातल्या विजेत्यांसोबत रविवारी मेलबर्न इथं पाकिस्तानचा अंतिम मुकाबला होईल.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com