Pandharpur Pilgrimage Planning Comprehensive Development Plan Priority
पंढरपूर तीर्थक्षेत्राचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यास प्राधान्य
– मंत्री उदय सामंत
विकास आराखड्याचे स्वरूप भाविकांना , नागरिकांना अभिप्रेत असेच असेल
मुंबई : पंढरपूर तीर्थक्षेत्राचा बहुआयामी व सर्वंकष विकास करण्याकरिता कॉरिडॉरची निर्मिती प्रस्तावित आहे. कॉरिडॉरचा प्रारूप विकास आराखडा जाहीर करण्यात आला असून जनतेच्या सूचना, हरकती यांचा विचार करून या आराखड्यास अंतिम मान्यता देण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले.
वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरमध्ये कॉरिडॉर करण्यासंदर्भात सदस्य मनीषा कायंदे यांनी लक्षवेधी सुचना मांडली होती. या लक्षवेधीस उत्तर देताना मंत्री श्री.सामंत बोलत होते.
मंत्री श्री. सामंत म्हणाले की, तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करताना गर्दीचे व्यवस्थापन, मंदिर परिसराचा विकास आणि त्यास भव्य स्वरूप देण्यासाठी प्रमुख देवस्थानाचा अभ्यास प्रशासनाने केला आहे. या विकास आराखड्याचे स्वरूप भाविकांना , नागरिकांना अभिप्रेत असेच असेल.
शहरातील पुरातन वास्तूंना धोका न पोहचवता हा विकास प्रस्तावित करण्यात येत आहे. हा आराखडा सध्या प्राथमिक स्तरावर आहे. अंतिम स्वरूप देताना येथील व्यावसायिक , दुकानदारांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाही, या दृष्टीने उपाययोजना करण्यात येतील, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.
भाविकांना द्यावयाच्या सोयी सुविधा, मंदिर व मंदिर परिसर विकास, घाट बांधकाम, दर्शन रांग व आपत्ती व्यवस्थापन, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिसरात करावयाची पायाभूत कामे जतन व संवर्धन, स्काय वॉक, दर्शन मंडप ब. पंढरपूर शहरात करावयाची पायाभूत कामे , ९ वाहन तळांचा विकास, ३९ रस्त्यांची सुधारणा. २८ एमएलडी क्षमतेची पाणीपुरवठा व १० एमएलडी क्षमतेची मलनिस्सारण योजना, ११ ठिकाणी शौचालये, ३ उद्यानांचा विकास, दोन्ही तीरावरील घाटांचा विकास, विश्रामगृह, पूल इ., विद्युत व्यवस्थेतची पायाभूत कामे. ९ पालखी तळांचे भूसंपादन व १८ पालखी तळांच्या ठिकाणी विकास कामे. वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसिध्दीच्या अनुषंगाने संत विद्यापीठ उभारणे, संत चोखामेळा स्मारक, संत नामदेव स्मारक इ. प्रस्तावित कामे, सी.सी.टी.व्ही. यंत्रणा उभारणे, मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय उभारणे इत्यादी बाबींचा समावेश या आराखड्यात असल्याचे मंत्री श्री .सामंत यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य महादेव जानकर, सचिन अहीर, अमोल मिटकरी, सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “पंढरपूर तीर्थक्षेत्राचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यास प्राधान्य”