Prime Minister asserted that Parliament is the medium that connects resolution to achievement
संसद म्हणजे संकल्प ते सिद्धीला जोडणारं माध्यम असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवीन संसद म्हणजे जनतेच्या आशा आकांक्षाचं प्रतीक असून लोकशाहीचं मंदीर आहे
संसदेची नवीन इमारत म्हणजे वास्तुरचनेचा उत्कृष्ट नमुना असून राष्ट्राच्या प्रगतीचं अभिमानास्पद प्रतीक
अंतर्गत रचनेवर देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं प्रतिबिंब
कार्यालयीन व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश
नवी दिल्ली : संसद भवनाच्या नव्या वास्तूचं लोकार्पण, आज सकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. सकाळी साडेसातच्या आधीच मोदी नव्यानं बांधलेल्या संसद भवनात आले आणि त्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी संसद भवनात प्रवेश केला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यासोबत त्यांनी नवीन संसद भवनात सेंगोल या राजदंडाची प्रतिष्ठापना केली. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या फलकाचं अनावरण केल्यानंतर मोदी यांनी, या नवीन संसद भवनाच्या उभारणीत सहभागी असलेल्या लोकांचा सत्कार केला. मोदी आणि बिर्ला यांनीही सर्व धर्म प्रार्थनेला हजेरी लावली.
नवीन संसद भवनाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या श्रमिकांशी झालेल्या संवादाच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. ही वास्तू उभारताना 60,000 श्रमिकांना रोजगार मिळाला. त्यांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकणारी नवीन गॅलरी सभागृहात उभारण्यात आली आहे. श्रमिकांचे योगदान संसद भवनात कायमस्वरूपी राहण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
अमित शाह, डॉ जितेंद्र सिंह, राजनाथ सिंह, अश्विनी वैष्णव, अनुराग सिंह ठाकूर, डॉ. मनसुख मांडविया, प्रल्हाद जोशी आणि भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री देखील सर्व धर्म प्रार्थनेत सहभागी झाले.
उद्घाटनप्रसंगी प्रधानमंत्री म्हणाले की नवीन संसद म्हणजे जनतेच्या आशा आकांक्षाचं प्रतीक असून लोकशाहीचं मंदीर आहे. लोकांची स्वप्नं इथून साकार होणार आहेत. संसद म्हणजे संकल्प ते सिद्धीला जोडणारं माध्यम असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी त्यांच्या ह्स्ते ७५ रुपयांच्या नाण्याचं अनावरण झालं.
संसद भवनाची नवी वास्तू जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशाला एक नवी ऊर्जा आणि एक नवे बळ मिळवून देईल, असे पंतप्रधानांनी सांगितले. आपल्या श्रमिक बांधवांनी या वास्तूला भव्यत्व मिळवून दिले आहेच, आता समर्पित वृत्तीने काम करुन या वास्तूचे दिव्यत्व-पावित्र्य वाढवण्याची जबाबदारी, आपल्या सर्व संसद सदस्यांची आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संसदेचे महत्त्व पटवून देताना पंतप्रधानांनी सांगितले की 140 कोटी भारतीयांचा दृढ निश्चय, संकल्प, संसदेला पावित्र्य प्रदान करतात.
संसदेच्या नवीन इमारतीचं बांधकाम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे वेगानं होऊ शकलं असं सभापती ओम बिर्ला यांनी आपल्या भाषणात सांगितलं. या इमारतीतून संसदेचं विधायक काम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संसदेची नवीन इमारत म्हणजे वास्तुरचनेचा उत्कृष्ट नमुना असून राष्ट्राच्या प्रगतीचं अभिमानास्पद प्रतीक आहे. या वास्तूच्या अंतर्गत रचनेवर देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं प्रतिबिंब असून, कार्यालयीन व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे. त्यामुळे संसद सदस्यांसाठी संपर्क आणि संवाद सुविधा अविरत उपलब्ध राहणार आहे.
६५ हजार चौरस मीटर क्षेत्रावर उभारलेल्या या परिसरात प्रादेशिक कला, हस्तकला आणि सांस्कृतिक वारसा यांचा संगम आढळतो. त्यामुळे यातून विविधतेने समृद्ध आणि चैतन्यपूर्ण आधुनिक भारताचं चित्र उभं राहतं. आधीच्या तुलनेत तिप्पट विस्तार असलेल्या लोकसभेच्या सभागृहात ८८८ आसन क्षमता असून राज्यसभेच्या सभागृहाची आसन क्षमता ३८४ इतकी आहे.
आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की संसद भवनाची ही नवी वास्तू, नव्या संपन्न, मजबूत आणि विकसित भारताच्या निर्मितीचा पाया ठरेल. धोरण, न्याय, सत्य, प्रतिष्ठा आणि कर्तव्याचा मार्ग अनुसरुन सामर्थ्यशाली बनणारा असा हा भारत देश आहे असे म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com