Participation of women is important in sharing global opportunities in higher education – Governor Bhagat Singh Koshyari
उच्च शिक्षणातील जागतिक संधींच्या देवाण-घेवाणीत स्त्रियांचा सहभाग महत्त्वाचा
– राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : शिक्षणाच्या संधी वेगाने विस्तारत असून उच्च शिक्षणातील जागतिक संधींच्या देवाण-घेवाणीत स्त्रियांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केले.
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्यावतीने न्यूयॉर्क येथील बीएमसीसी कॉलेजच्या सहकार्याने राजभवन येथे आयोजित ‘उच्च शिक्षणाच्या जागतिक देवाण-घेवाणीतील संधी आणि आव्हाने’ या कार्यक्रमात राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते.
यावेळी बीएमसीसी विद्यापीठाचे संचालक डॉ. ॲन्थोनी मुनशेर व एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उज्व्वला चक्रदेव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी राज्यपालांच्या उपस्थितीत एसएनडीटी विद्यापीठ आणि बीएमसीसी महाविद्यालय या दोन संस्थांमध्ये शैक्षणिक सहकार्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला.
दोन्ही संस्थाच्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून दोन्ही देशांत शैक्षणिक, सामाजिक त्यासोबतच सांस्कृतिक संधीची, विचारांची देवाणघेवाण होईल, अशी अपेक्षा राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली.
महाराष्ट्रात स्त्री शिक्षणात कार्यरत एसएनडीटी विद्यापीठाचे योगदान व्यापक आहे. त्याचप्रमाणे अमेरिकास्थित बीएमसीसी हे कम्युनिटी कॉलेज देखील स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असून या आंतरराष्ट्रीय सामंजस्य करारामुळे स्त्रियांच्या उच्च शिक्षणाच्या संधी निश्चितच अधिक विस्तारतील. या माध्यमातून दोन्ही देशांतील स्त्रियांच्या शिक्षणाच्या संधीला विस्तीर्ण व्यासपीठ उपलब्ध होण्यास सहाय्य होईल, असेही श्री. कोश्यारी यावेळी म्हणाले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com