Plantation of trees under Harit Vari Abhiyaan in the Palkhi ceremony
पालखी सोहळयात हरित वारी अभियानाअंतर्गत वृक्षलागवड
-
अभियानांतर्गत १० हजार वृक्षांची लागवड व संवर्धन करण्यात येणार
-
पालखी तळ आणि पालखी मार्गावर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम
-
विविध प्रकारच्या आणि उपयुक्त वृक्षांची लागवड
-
जिल्ह्यातील ७ नगरपालिका आणि २५ ग्रामपंचायत क्षेत्रातही वृक्ष लागवड
पुणे : आषाढी एकादशी यात्रा पालखी सोहळा सन २०२३ अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘हरित वारी’ अभियानाअंतर्गत वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत १० हजार वृक्षांची लागवड व संवर्धन करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हरित वारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पालखी तळ आणि पालखी मार्गावर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. वारकऱ्यांना वृक्षाचे महत्व समजावून देण्यासोबतच त्यांच्या हस्ते वृक्ष लागवडही करण्यात येत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्षाचे संवधर्नही करण्यात येणार आहे.
चिंच, वड, चाफा, पाम, नारळ, गुलमोहोर, कडुलिंब, पिंपळ, रेन ट्री, करंज, मोहोगनी, जांभूळ अशा विविध प्रकारच्या आणि उपयुक्त वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. त्यासाठी चांगली रोपेदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत नगरपालिकेतर्फे ३ हजार २२५, ग्रामपंचायत २ हजार ३५० आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातर्फे २ हजार असे एकूण ७ हजार ५७५ वृक्ष लावण्यात येत आहेत. वृक्षांच्या संवर्धनाची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणातर्फे ‘हरित वारी’ अंतर्गत लोणंद ते दिवेघाट संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील पिसुर्टी, निरा, पिपरे, बाळुपाटलाची वाडी, पाडेगाव, लोणंद परिसरातील ४ किलोमीटर लांबीच्या रस्तयाच्या दुतर्फा २ हजार झाडे लावण्यात येतील. तसेच जिल्ह्यातील ७ नगरपालिका आणि २५ ग्रामपंचायत क्षेत्रातही वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील संपूर्ण वारी मार्गावर हा उपक्रम राबविण्यात येत असून स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनीदेखील उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी वनश्री लाभशेटवार यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com