PM Modi interacts with students, teachers and parents in Pariksha Pe Charcha
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रधानमंत्र्याचा शिक्षक आणि पालकांशी संवाद
नवी दिल्ली : सणांच्या काळातच परीक्षा असतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी परिक्षांनाही उत्सव समजले तर त्यांच्यावर ताण येणार नाही, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी आज परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमाद्वारे देश विदेशातले विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
मुलं आपल्या विद्यार्थी जीवनात सतत परिक्षा देतात त्यामुळे ते एक्झामप्रुफ झाले असल्याचं ते म्हणाले. जगाचं भविष्य असलेल्या नव्या पिढीनं हाती घेतलेलं प्रत्येक काम आत्मविश्वासानं करावं, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. मुलांचं मन जिज्ञासू असेल तर त्यांना माध्यमबदलाचा परिणाम जाणवत नाही असं प्रधानमंत्री म्हणाले.
ऑनलाईन अभ्यासात येणाऱ्या अडचणी संदर्भातल्या प्रश्नावर ते बोलत होते. काळानुरूप अभ्यासाची पद्धत आणि माध्यम बदलणं स्वाभाविक आहे असंही त्यांनी सांगितलं. तंत्रज्ञानामुळे ज्ञान प्राप्ती सुलभ झाली असली तरी विद्यार्थ्यांना स्वतः ला जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे.
यासाठीच २१व्या शतकासाठी अनुरुप असं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण बनवण्यात आलं आहे असं ते म्हणाले. या धोरणात मुलांच्या कौशल्य आणि व्यक्तिगत विकासाला प्राधान्य देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. इश्वरानं सगळ्यांना बुद्धीमत्ता दिली आहे, पण प्रत्येकानं मेहनत करणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले.
राज्यातही परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाअंतर्गत विविध ठिकाणी विद्यार्थ्यांचा उत्साह दिसू्न आला. मुंबईत गोरेगाव इथल्या सेंट जॉन शाळेच्या शिक्षिका संगीता कांबळे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या .
पालघर जिल्ह्यातल्या बऱ्याच शाळांमधले विद्यार्थी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमासाठी पालघर जिल्ह्यातून अॅटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल तारापूर मधल्या इयत्ता नववीतल्या ख़ुशी चांदेकर या विद्यार्थिनीची निवड झाली होती.
बटेगावच्या कांबळ गावातल्या एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल मधले इयत्ता नववी ते बारावीचे जवळपास 219 विद्यार्थी आणि 18 शिक्षक उत्फुर्तपणे सहभागी झाले होते.
महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल संस्थेच्या एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल कांबळगावामध्ये परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला.
वाशिम जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालयातले ४९५ विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मुख्याध्यापक सचिन खरात यांच्यासह ४० शिक्षक आणि १०० पालकांनी थेट प्रसारण पाहिलं.
धुळे इथं जवाहर नवोदय विद्यालयात आज सकाळी सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीनं या कार्यक्रमात सहभाग घेतला. विद्यालयाच्या प्राचार्य उषा माने यांनी याबाबत सांगितलं.
पालकांच्या दबावामुळे मुलांना आपल्या आवडीचं क्षेत्र निवडता येत नाही. पालक आणि शिक्षकांनी मुलांवर आपली स्वप्नं न लादता त्यांच्या इच्छा जाणून घ्याव्यात असा सल्ला प्रधानमंत्र्यांनी दिला.