प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय मालवाहतूक धोरणाचं अनावरण

Prime Minister Narendra Modi

The Prime Minister unveiled the National Freight Policy

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय मालवाहतूक धोरणाचं अनावरण

नवी दिल्ली : मालवाहतूकीचा खर्च सध्याच्या १३ ते १४ टक्क्यांवरुन १० टक्क्यांपेक्षा कमी करण्याच्या उद्देशानं आखलेल्या राष्ट्रीय मालवाहतूक धोरणाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  लोकार्पण केलं. यामुळं जागतिक बाजारपेठेत आपण स्पर्धा करु शकतो असं ते नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

Prime Minister Narendra Modi
File Photo
सागरमाला, भारतमाला यासारखे प्रकल्प, मालवाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी मालवाहू वाहनांसाठी विशेष मार्ग आणि योजनाबद्धतेने निर्माण केलेल्या पायाभूत सुविधांमुळे मालवाहतुकीच्या पद्धतीत सुधारणा झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

देशातल्या बंदरांची क्षमताही वाढली असून जहाज रिकामे करण्याचा कालावधी हा ४४ तासांवरुन २६ तासांवर आला असल्याचंही ते म्हणाले. निर्यात वाढीसाठी ४० हवाई कार्गो टर्मिनल उभारण्यात आले असून ३० विमानतळांवर शीतगृहांची व्यवस्था असल्याचंही त्यांनी सांगितलं. ३५ मल्टीमोड हबचीही लवकरच उभारणी होणार असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

जलमार्गामुळे आपण पर्यावरण पुरक आणि कमी खर्चात मालवाहतूक करु शकत असल्यानं देशात अनेक जलमार्गांची उभारणी करण्यात आल्याचंही ते म्हणाले. कोरोनाच्या काळात शेती मालाच्या वाहतूकीसाठी राबवण्यात आलेल्या किसान रेल आणि किसान उडान या सेवेचाही त्यांनी उल्लेख केला. देशातल्या ६० विमानतळांवर सध्या कृषी उडानची सोय असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मालवाहतूक क्षेत्र मजबूत करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देतांनाच त्यांनी कागदविरहित प्रणाली त्याचप्रमाणे इ संचित, ऑनलाईन सीमाशुल्क, फास्ट टॅग, आदीची व्यवस्था करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. जीएसटी मुळेही या क्षेत्राला फायदा झाल्याचं सांगत त्यांनी ड्रोन द्वारे होणाऱ्या मालवाहतूकीवर भर देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. या साऱ्या प्रयत्नांमुळेच राष्ट्रीय मालवाहतूक धोरण तयार झाल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
गतीशक्ती आणि नव्या मालवाहतूक धोरण यांच्या एकत्र परिणामामुळे देश एका नव्या कार्यसंस्कृतीचा भाग होत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. नव्याने स्थापन झालेल्या गतीशक्ती विद्यापिठातून येणाऱ्या पिढीचा याला मोठा हातभार लागेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, हवाई उड्डाण मंत्री ज्योतिर्दित्य सिंधीया, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, उद्योग व व्यापार राज्यमंत्री सोम प्रकाश यांच्यासह मालवाहतूक क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *