PM unveils 108 ft statue of Hanuman ji in Morbi, Gujarat
पंतप्रधानांनी गुजरातमधील मोरबी येथे हनुमानजींच्या 108 फूट पुतळ्याचे केले अनावरण
“राम कथा हे सबका साथ-सबका प्रयासचे सर्वोत्तम उदाहरण, हनुमानजी यातील प्रमुख भाग आहेत”
नवी दिल्ली : हनुमान जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरातमधील मोरबी येथे हनुमानजींच्या 108 फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी महामंडलेश्वर माता कनकेश्वरी देवी उपस्थित होत्या.
मोरबी येथील हनुमानजींच्या 108 फूट पुतळ्याचे लोकार्पण हा जगभरातील हनुमानजींच्या भक्तांसाठी आनंदाचा प्रसंग आहे असे हनुमान जयंतीनिमित्त भक्तांना शुभेच्छा देताना पंतप्रधान म्हणाले. नजीकच्या काळात अनेकवेळा भक्त आणि आध्यात्मिक नेत्यांचे सान्निध्य लाभल्याबद्दल त्यांनी मनापासून आनंद व्यक्त केला. नुकतेच उनियामाता, माता अंबाजी आणि अन्नपूर्णाजी धाम संबंधित कार्यक्रमात जोडले जाण्याची संधी मिळाल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.ही ‘हरी कृपा’, असल्याचे ते म्हणाले.
देशाच्या चारही कोपऱ्यांमध्ये असे चार पुतळे उभारण्याचा प्रकल्प हा ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ संकल्पाचे प्रतिबिंब असल्याचे पंतप्रधान म्हणाले. हनुमानजी आपल्या सेवाभावाने सर्वांना एकत्र आणतात आणि प्रत्येकाला त्यांच्याकडून प्रेरणा मिळते असे त्यांनी स्पष्ट केले. वनात राहाणाऱ्या समुदायांना प्रतिष्ठा आणि सशक्त करणारे हनुमानजी हे सामर्थ्याचे प्रतीक आहेत. “हनुमानजी एक भारत श्रेष्ठ भारताचे एक प्रमुख सूत्र आहेत”, असे ते पुढे म्हणाले.
त्याचप्रमाणे, देशभरात विविध भागात आणि भाषांमध्ये आयोजित केली जाणारी राम कथा प्रत्येकाला देवाच्या भक्तीमध्ये गुंफते. आपल्या आध्यात्मिक वारशाची, संस्कृतीची आणि परंपरेची ही ताकद आहे. गुलामगिरीच्या कठीण काळातही यानेच विखुरलेल्या भागांना एकत्र ठेवले आहे, असे मोदींनी नमूद केले. यामुळे राष्ट्रच्या स्वातंत्र्यासाठीच्या एकत्रित प्रयत्नांना बळ मिळाले. “हजारो वर्षांच्या चढउतारांना तोंड देत, आपल्या सभ्यता आणि संस्कृतीने भारताला स्थिर ठेवण्यात मोठी भूमिका बजावली आहे”, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.
पंतप्रधान म्हणाले, “आपला विश्वास आणि आपल्या संस्कृतीचा प्रवाह समरसता, समानता आणि समावेशाचा आहे”. प्रभू राम पूर्ण सक्षम असूनही आपली कार्ये पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाच्या क्षमतेच्या उपयोग करून घेतात यावरून हे उत्तम प्रकारे दिसून येते. “राम कथा हे सबका साथ-सबका प्रयासचे सर्वोत्तम उदाहरण आहे आणि हनुमानजी हा त्यातील एक प्रमुख भाग आहे”,संकल्पाच्या पूर्ततेसाठी सबका प्रयासच्या त्याच भावनेचे आवाहन मोदी यांनी केले.
स्वच्छता मोहीम आणि लोकल फॉर वोकल अभियानाकरता भाविक आणि संत समुदायाची मदत घेण्याच्या विनंतीचा पुनरुच्चार करून मोदी यांनी समारोप केला.
#Hanumanji4dham प्रकल्पा अंतर्गत देशभरात चारही दिशांना हनुमानजीं यांचे चार पुतळे उभारले जात आहेत. आज अनावरण करण्यात आलेला पुतळा या प्रकल्पातील दुसरा पुतळा आहे. मोरबी येथील परमपूज्य बापू केशवानंद यांच्या आश्रमात पश्चिमेला त्याची स्थापना करण्यात आली आहे.
या मालिकेतील पहिला पुतळा 2010 मध्ये उत्तरेला सिमला येथे उभारण्यात आला होता. दक्षिणेकडील रामेश्वरम इथल्या पुतळ्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
Hadapsar News Bureau.