Pune Municipal Corporation should not collect increased income tax from citizens – Higher and Technical Education Minister Chandrakant Patil
पुणे महानगरपालिकेने नागरिकांकडून वाढीव मिळकत कर वसूल करू नये – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : पुणे महानगरपालिकेच्या वतीने मिळकत करामध्ये दिली जाणारी ४० टक्के सवलत पुन्हा लागू करावी, अशी नागरिकांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक घेऊन यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आज मंत्रालयात याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, मिळकत करामध्ये ४० टक्के सवलत पुन्हा मिळावी तसेच नागरिकांकडून घेतली जाणारी ही फरकाची रक्कम वसूल करू नये, अशी मागणी पुणेकर नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.
शहरातील मिळकत धारकांना दिली जाणारी ४० टक्के सवलत रद्द करण्यात येत असून पालिकेने यापुढील काळात ही सवलत देऊ नये, असे राज्य सरकारने यापूर्वीच पालिकेला कळविले आहे. त्यानुसार पालिका आयुक्त यांनी ४० टक्के सवलत रद्द केली आहे. परंतू गेल्या तीन वर्षापासून ही सवलत रद्द झाल्याने नागरिकांकडून फरकाची रक्कम वसूल करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. यामुळे वाढीव कराचा बोजा नागरिकांवर पडत आहे आणि ही फरकाची रक्कम तातडीने भरण्याबाबतचे संदेश (एसएमएस) देखील पालिका प्रशासनाने पाठविल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे.
याबाबत तातडीने मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावली जाईल तोपर्यंत महानगरपालिकेने नागरिकांकडून घेतली जाणारी ही फरकाची रक्कम वसूल करू नये, अशा स्पष्ट सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com