Positive youth interaction with 40 lakh youth across the state will be important
राज्यभरात ४० लाख युवकांशी होणारा सकारात्मक युवा संवाद महत्त्वाचा ठरणार- राजेश पांडे
देशाच्या युवा पिढीमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला, तर ते देशाला विश्वगुरू म्हणून जगासमोर घेऊन येतील
राज्यभरातील युवक सक्षम होण्यासाठी हे अधिवेशन उपयुक्त
पुणे : “राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत राज्यभरातील तरुणाईला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी खूप मोठी संधी उपलब्ध आहे. त्या आधारे तरुणांमध्ये आपल्या भविष्याविषयी आत्मविश्वास निर्माण झाला, तर ते देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी ही योजना निश्चितपणे वापरतील,” असा विश्वास योजनेच्या राज्य समितीचे सल्लागार राजेश पांडे यांनी शनिवारी व्यक्त केला.
राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विद्यापीठामध्ये राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी अधिवेशन आणि जी-२० परिषदेनिमित्ताने पुण्यात नजिकच्या काळात आयोजित शैक्षणिक उपक्रमांसाठीच्या उपक्रम अनावरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रामध्ये पांडे यांनी उपस्थित कार्यक्रम अधिकाऱ्यांशी संवाद साधला. पद्मश्री पोपटराव पवार, पद्मश्री मिलिंद कांबळे, ‘तेर पॉलिसी’च्या विनिता आपटे, ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’चे डॉ. प्रसाद देवधर, योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. रामेश्वर कोठावळे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य, सिनेट सदस्य राहुल पाखरे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सदानंद भोसले, प्राचार्य डॉ. संजय चाकणे आदी मान्यवर या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
पांडे म्हणाले, “योजनेचा सल्लागार म्हणून राज्यातील ‘एनएसएस’ला नवे रुप देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी हे अधिवेशन आणि त्याआधारे राज्यभरात ४० लाख युवकांशी होणारा सकारात्मक युवा संवाद महत्त्वाचा ठरणार आहे. देशाच्या युवा पिढीमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला, तर ते देशाला विश्वगुरू म्हणून जगासमोर घेऊन येतील. त्यासाठी राज्यभरातील युवक सक्षम होण्यासाठी हे अधिवेशन उपयुक्त ठरेल,” असा विश्वासही पांडे यांनी व्यक्त केला.
पवार यांनी ‘एनएसएस’ आणि ‘एनसीसी’ या योजनांची उपयुक्तता उपस्थितांसमोर मांडली. हे विषय सक्तीचे करून त्या आधारे युवकांना मूल्यशिक्षण, संस्कार आणि समाजोपयोगी उपक्रमांसाठीचे प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. देशासमोरील समस्या सोडविण्यासाठी असे प्रशिक्षण घेतलेली पिढी उपयुक्त ठरणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
कांबळे यांनी नव्या शैक्षणिक धोरणामधील विविध समाजोपयोगी योजना समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘एनएसएस’ने काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. डॉ. देवधर व आपटे यांनीही या वेळी उपस्थितांशी संवाद साधत त्यांना संशोधनाधारित सामाजिक कार्यांवर भर देण्याचे आवाहन केले.
स्वामीराज भिसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. भोसले यांनी आभार मानले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com