Senior journalist and presenter Pradip Bhide passed away
ज्येष्ठ वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचे निधन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ वृत्त निवेदक प्रदीप भिडे यांना श्रद्धांजली
ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
मुंबई : प्रसन्न व्यक्तिमत्त्व, भारदस्त आवाज, सुस्पष्ट उच्चारांनी दूरदर्शनच्या बातम्या गावागावात पोहोचणारे ज्येष्ठ निवेदक प्रदीप भिडे यांचं आज दुपारी मुंबईत निधन झालं.
संध्याकाळी अंधेरीतल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते ६९ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून आजारपणामुळं ते घरीच होते. ३५ वर्षांहून अधिक काळ दूरदर्शनवर त्यांनी केलेलं निवेदन आजही प्रेक्षकांना लक्षात आहे. त्यापूर्वी ते काही काळ निर्मिती सहायक म्हणूनही दूरदर्शनवर कार्यरत होते.
याशिवाय आकाशवाणीवरही विशेष कार्यक्रमांच्या निवेदनात त्यांचा सहभाग होता. त्यांच्या आवाजातल्या जाहिराती अनेक जनमानसाच्या मनावर खोलवर परिणाम करुन गेल्या.मराठी विश्वकोशातल्या अनेक नोंदीसारख्या काही महत्त्वाचे दस्तऐवज त्यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाले आहेत. अनेक माहितीपटांनाही त्यांनी आवाज दिला होता. दूरदर्शन, आकाशवाणी, जाहिरात क्षेत्रात त्यांचं नाव झालं तरी रंगभूमी हे त्यांचं पहिलं प्रेम होतं.
प्रदीप भिडे यांचे आई आणि वडील शुभलक्ष्मी व जगन्नाथ हे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून काम करत होते. विविध ठिकाणच्या शाळांमध्ये बदली होत असल्याने प्रदीप यांचे शिक्षण महाराष्ट्रातील पाच ते सहा खेडेगावांतून झाले. अकरावी झाल्यानंतर ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आले. विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी ‘रानडे’मधून पत्रकारितेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. भाषेचे संस्कार लहानपणापासूनच घरातून झाले होते.
‘ई-मर्क’ आणि ‘हिंदूस्थान लिव्हर’ या बहुराष्ट्रीय कंपन्यांत त्यांनी ‘जनसंपर्क अधिकारी’ म्हणून सुरवातीला काही काळ नोकरीही केली. मुंबई दूरदर्शन केंद्र १९७२ मध्ये सुरू झाले आणि १९७४ च्या डिसेंबर महिन्यात ते वृत्तनिवेदक म्हणून नोकरीला लागले
रत्नाकर मतकरी यांच्या आरण्यक आणि विश्वास मेहेंदळे यांच्या पंडित, आता तरी शहाणे व्हा यासारख्या नाटकात त्यांनी भूमिका केल्या होत्या. एका वृत्तपत्रात ते नाट्य समीक्षणही लिहायचे. भारदस्त आवाज आणि वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे दूरदर्शनच्या बातम्यांची ओळख बनलेल्या भिडे यांनी वृत्तनिवेदनाच्या क्षेत्रात एक खास प्रतिमा तयार केली अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
भिडे यांच्या जाण्यानं दूरदर्शन बातम्यांचा बुलंद मराठी आवाज हरपला आहे, अशा शब्दात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.माजी माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
अतिशय लोभस आणि राजबिंडं व्यक्तीमत्तव असलेले प्रदीप भिडे खास आवाज आणि लकबीमुळं कायम लक्षात राहतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
आवाजाने घराघरांत पोहचलेले व्यक्तीमत्व
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ वृत्त निवेदक प्रदीप भिडे यांना श्रद्धांजली
वृत्त निवेदनातून आपल्या आवाजाने घराघरात पोहचलेले बातम्या, घडामोडींच्या क्षेत्रातील जाणकार आणि निरलस, निखळ व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ वृत्त निवेदक प्रदीप भिडे यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, दूरचित्रवाणी वृत्त वाहिन्यांचे युग सुरू होण्या आधीच दिवंगत भिडे यांनी प्रादेशिक बातम्या आणि त्यातही मराठी वृत्त निवेदनात एक मापदंड निर्माण केला. त्यांचा आवाज व्यक्तीमत्वाप्रमाणेच भारी भक्कम होता. त्यांची वृत्त निवेदनाची, सुत्रसंचलनाची शैली ही त्यांची ओळख बनून घराघरात पोहोचली.
मराठी बातम्यांमधील शब्दांचे उच्चारण ते संयमीत सादरीकरण यासाठी ते सदैव लक्षात राहतील. ज्येष्ठ निवेदक प्रदीप भिडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
दूरदर्शनच्या मराठी बातम्यांना लोकप्रियता मिळवून देणारा विश्वासार्ह आवाज हरपला
माध्यम क्षेत्रातल्या तरुणांचा मार्गदर्शक हरपला, मराठी माध्यमसृष्टीची मोठी हानी
“ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांच्या निधनानं दूरदर्शनच्या मराठी बातम्यांना लोकप्रियता मिळवून देणारा विश्वासार्ह आवाज हरपला आहे. मराठी वृत्तनिवेदन, सूत्रसंचालक म्हणून माध्यम क्षेत्रात लीलया संचार करणारं व्यक्तिमत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे.
वृत्तनिवेदक म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेला प्रदीप भिडे यांच्या आवाजानं चार दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राचं प्रबोधन केलं. त्यांच्या निधनानं माध्यम क्षेत्रातल्या तरुणांचा मार्गदर्शक हरपला आहे. माध्यमसृष्टीची मोठी हानी झाली आहे.
प्रदीप भिडे यांचा आवाज लाभलेल्या जाहिरातपट, माहितीपटातून ते यापुढेही आपल्याला भेटत राहतील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.
हडपसर न्युज ब्युरो