The administration’s preparations for the Palkhi ceremony are in the final stage
पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात
सर्व कामे १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन
पुणे : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२२ साठी प्रशासनाने आवश्यक नियोजन केले असून त्यासंबंधितची कामे अंतिम टप्प्यात आहे. पालखी तळ व इतर अनुषंगिक सुविधांची कामे १५ जूनपर्यंत पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मौजे उरळी देवाची येथील साईड पट्टयांची कामे, वडकीनाला येथील पालखी विसाव्याच्या ठिकाणी असलेल्या चरांची दुरुस्ती, लोणी काळभोर येथील मोऱ्यांची दुरुस्ती, बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे येथील सर्विस रोडची दुरुस्ती, दौंड ते निरा रस्त्याच्या साईड पट्टयांची दुरुस्ती ही कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे करण्यात येत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कऱ्हा नदीवरील पुलाची दुरुस्ती, इंदापुर तालुक्यातील आंथुर्णे आणि सणसर येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणी सपाटीकरण व रस्ता, करण्यात येत आहे. सासवड नगरपालिकेतर्फे पालखी तळ आणि विसाव्याच्या ठिकाणाशी संबंधित कामे वेगाने करण्यात येत आहेत.
जेजुरी पालखी तळाची कामे सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषद आणि दोन्ही महानगरपालिकेतर्फे महिलांच्या आरोग्यासाठी आवश्यक सुविधांसह स्त्रीरोग तज्ञांची सुविधा देण्यात येणार आहे. पालखी मार्गावर महिलांसाठी ५ किमी अंतरावर शौचालय सुविधा करण्यात येणार आहे.
सर्व उपविभागीय अधिकारी यांची समन्वय अधिकारी आणि तहसिलदार यांची उपसमन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून अनुषंगिक कामांचा त्यांच्याकडून दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी गावनिहाय संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे.
पाणी पुरवठ्यासाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे. आषाढी वारीसाठी ३७ विहिरी आणि विंधनविहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत आणि ७० टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. ११२ वैद्यकीय अधिकारी आणि ३३६ कर्मचाऱ्यांची आरोग्यसेवेसाठी पालखी मार्गावर नियुक्ती करण्यात आली आहे. २३ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ८७ फिरते वैद्यकीय पथक आणि १०८ रुग्णवाहिकेद्वारे आरोग्य सुविधा करण्यात येणार आहे.
परिवहन विभागातर्फे पालखी सोहळ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या सुरक्षाविषयक तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्गावरील मांसाहारी हॉटेल, मच्छी् मार्केट, दारुची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. अन्न व औषध प्रशासनातर्फे खाद्य आणि पेय पदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे. अतिरिक्त मोबाईल टॉवर उभारण्याचे नियेाजन आहे.
पालखी मार्गावर प्रस्थानाच्या वेळी ठरावीक मार्गावरील वाहतूक बंद करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्गावरील रुग्णालयातील १० टक्के खाटा पालखी सोहळ्यादरम्यान आरक्षीत ठेवण्यात येणार आहेत. पालखी व्यवस्थापनाबाबत माहितीसाठी पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले आहे.
हडपसर न्युज ब्युरो
One Comment on “पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात”