President Draupadi Murmu approves the appointment of Justice Dhananjaya Chandrachud as the new Chief Justice of the country
देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांची नियुक्ती करायला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी
नवी दिल्ली : देशाचे आगामी सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांची नियुक्ती करायला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज मंजुरी दिली.
विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती उदय लळीत येत्या ८ नोव्हेंबरला सेवानिवृत्त होणार आहे. ज्येष्ठताक्रमानुसार पुढचे न्यायाधीश चंद्रचूड यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची शिफारस त्यांनी सरकारला केली होती. त्यानंतर राष्ट्रपतींनी या नियुक्तीला मंजुरी दिली. ९ नोव्हेंबरपासून चंद्रचूड यांची नियुक्ती लागू होईल.
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचं पूर्ण नाव धनंजय यशवंत चंद्रचूड आहे. त्यांचा जन्म पुण्यात झाला. धनंजय चंद्रचूड यांचे शालेय शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल व जॉन कॅनन स्कूलमध्ये आणि नवी दिल्लीत सेंट कोलंबा स्कूलमध्ये झाले.
दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्र व गणितात प्रथम क्रमांकाने पदवी संपादन केल्यावर त्यांनी तेथूनच एल्एल.बी. आणि हार्वर्ड विद्यापीठातून एल्एल.एम. प्राप्त केली. त्यानंतर हार्वर्डमधून जोसेफ बेले पारितोषिकासह न्यायशास्त्र (ज्युरिडिकल सायन्स) विषयात डॉक्टरेटही मिळविली.
चंद्रचूड यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय दोन्ही ठिकाणी वकिली केली. जून १९९८ मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील म्हणून मान्यता मिळाली. १९९८ ते २००० या काळात धनंजय चंद्रचूड यांनी अॅडिशनल सॉलिसीटर जनरल म्हणून काम केलं. मार्च २००० मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. महाराष्ट्र ज्युडिशीयल अकॅडमचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केलं.
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलं आहे. २०१६ मधे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. धनंजय चंद्रचूड हे सध्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. ते १० नोव्हेंबर २०२४ ला निवृत्त होत आहेत. त्यामुळे आता त्यांना सरन्यायाधीश म्हणून दोन वर्षांचा कालावधी मिळणार आहे.
लळित यांच्यानंतर सरन्यायाधीशपदावर आणखी एक मराठी व्यक्ती बसणार आहे. चंद्रचूड देशाचे ५० वे सरन्यायाधीश असतील.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com