नागपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या स्थायी परिसराचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

President of India inaugurates permanent Campus of Indian Institute of Management, Nagpur

नागपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या स्थायी परिसराचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

शैक्षणिक संस्था या केवळ शिक्षणाचे स्थान नव्हे तर आपल्यातल्या सुप्त कलागुणांना पैलू पाडत नवी झळाळी देणारे ठिकाण : राष्ट्रपती राम नाथ कोविंद

नागपूर : शैक्षणिक संस्था या केवळ शिक्षणाचे स्थान नव्हे तर आपल्यातल्या सुप्त कलागुणांना पैलू पाडत नवी झळाळी देणारे ठिकाण असल्याचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी म्हटले आहे. नागपूरच्या मिहान, दहेगाव मौजा इथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अर्थात भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या स्थायी परिसराचे उद्घाटन करताना ते आज बोलत होते. अभ्यासक्रम हा आपल्याला आपले ध्येय, महत्वाकांक्षा याबाबत आत्मपरीक्षणाची संधी देत आपल्या स्वप्नांची पूर्तता करतो, असे राष्ट्रपती म्हणाले.

नवोन्मेश आणि उद्योजकता यांना प्रशंसेची पावती देत प्रोत्साहन देणाऱ्या युगात आपण राहत आहोत. नवोन्मेश आणि उद्योजकता या दोन्हीतही, तंत्रज्ञानाद्वारे आपले जीवन अधिक सुकर करण्याची क्षमता तर आहेच त्याचबरोबर अनेकांना रोजगाराच्या संधी पुरवण्याचेही सामर्थ्य आहे. आयआयएम नागपूर इथली परिसंस्था, रोजगार मागणारे ऐवजी रोजगार पुरवणारे होण्याची मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये रुजावी यासाठी प्रोत्साहन देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आयआयएम नागपूरने, आपल्या उद्योजकता केंद्राद्वारे आयआयएम नागपूर फौंडेशन फॉर इंट्राप्रेनरशिप डेव्हलपमेंट (InFED) उभारल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. इनफेडने महिला स्टार्ट अप कार्यक्रमातून महिला उद्योजकांना यशस्वी पदवीधारक होण्यासाठी सक्षम केल्याची बाब निश्चितच अभिमानास्पद असल्याचे सांगून त्यापैकी सहा जणींनी उद्योगाचा प्रारंभ केल्याचे राष्ट्रपती म्हणाले. असे कार्यक्रम, महिला सबलीकरणासाठी प्रभावी मंच पुरवतात.

कोणतीही गोष्ट परस्परांमध्ये वाटून घेण्याच्या, विशेषकरून ज्ञान क्षेत्रात आपल्याकडचे ज्ञान इतरांनाही देण्यावर आपल्या संस्कृतीचा नेहमीच भर राहिला आहे. म्हणूनच आपल्याकडे जे ज्ञान आहे ते सर्वांना देणे हे आपले कर्तव्य आहे असे राष्ट्रपतींनी सांगितले. आयआयएम अहमदाबादने ज्याप्रमाणे नागपूर आयआयएमसाठी मार्गदर्शन पुरवले आहे, त्याचप्रमाणे देशातल्या तंत्र, व्यवस्थापन क्षेत्रातल्या अग्रगण्य व्यावसयिक शिक्षण देणाऱ्या संस्था अशाच संस्थांच्या उभारणीसाठी मार्गदर्शन पुरवतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ज्ञान दान केल्याने, दुसऱ्याला दिल्याने ज्ञानाची वृद्धी होते असे राष्ट्रपती म्हणाले. पुणे, हैदराबाद आणि सिंगापूर इथे उपग्रह परिसर उभारण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी आयआयएम नागपूरचे अभिनंदन केले.

हडपसर न्यूज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *