Priority to increase revenue generation with clean and transparent governance – State Excise Minister Shambhuraj Desai
स्वच्छ व पारदर्शक कारभारासह महसुली उत्पन्न वाढवण्याला प्राधान्य – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई
मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये स्वच्छ व पारदर्शक कारभारसह महसुली उत्पन्न वाढवण्याला प्राधान्य राहील, यासाठी विभागातील सर्वांचे सहकार्य लाभेल असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्रालयात आपल्या दालनात प्रवेश करुन कामकाजाला प्रारंभ केला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना श्री.देसाई बोलत होते. मंत्रालयातील मुख्य इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर दालन क्र. 302 या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांचे कार्यालय आहे.
यावेळी खासदार हेमंत पाटील, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल बी. उमाप, श्री.देसाई यांच्या मातोश्री विजयादेवी देसाई व कुटुंबिय उपस्थित होते.
राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री.देसाई म्हणाले, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कार्य करीत आहोत.
महाराष्ट्र राज्य देशाच्या विकासाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकाचे राज्य करण्याचे ध्येय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळगले आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्या विभागाची जबाबदारी माझ्यावर सोपविलेली आहे. त्या विभागाची उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन ते परिपूर्ण करण्यासाठी माझा विभाग काम करेल.
राज्य उत्पादन शुल्क विभाग राज्याला उत्पन्न मिळवून देण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकाचा विभाग आहे. गेल्या वर्षी या विभागांनी 17 हजार 500 कोटी महसूल राज्याला मिळवून दिला आहे.राज्याला त्यापेक्षा अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी विभागाच्यावतीने जे उद्दिष्ट दिले आहे त्या उद्दिष्टाप्रमाणे राज्याला उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहू असेही श्री. देसाई यांनी सांगितले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com