A teacher should continue working even after retirement
सेवानिवृत्ती नंतरही आपल्या अनुभवाचा फायदा समाजाला व विद्यार्थ्यांना होण्यासाठी शिक्षकाने कार्यरत राहणे गरजेचे
-श्री.राजेंद्र घाडगे
प्रा. संजीव बाळकृष्ण पवार यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न
हडपसर: अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर येथील शारीरिक शिक्षण शिक्षक व आजीव सेवक सदस्य, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे प्रा.संजीव बाळकृष्ण पवार हे ३३ वर्षाच्या अविरत सेवेतून निवृत्त झाले.
नुकताच श्री पवार यांचा गौरव समारंभ संपन्न झाला. सेवापूर्ती गौरव समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मा. श्री.राजेंद्र घाडगे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव मा. अॅड.संदीप कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, ज्येष्ठ विचारवंत प्रा. जे.पी.देसाई, प्राचार्य डॉ. पंडित शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. संजय सोनवणे, पतसंस्थेचे चेअरमन श्री.अशोक आवारी यांच्या सह आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात मा.श्री. राजेंद्र घाडगे म्हणाले, सेवानिवृत्ती नंतरही आपल्या अनुभवाचा फायदा समाजाला व विद्यार्थ्यांना होण्यासाठी शिक्षकाने कार्यरत राहणे गरजेचे आहे. मा. मानद सचिव संदीप कदम म्हणाले, प्रा.संजीव पवार यांच्या प्रमाणेच प्रत्येकाने आपली शारीरिक सुदृढता राखण्यासाठी प्रयत्न करावा. प्रा. जे.पी.देसाई म्हणाले की, सेवेत असताना जीवनातील नीतिमूल्य, तत्त्व व कामावरील निष्ठा, प्रामाणिकपणा याचा अवलंब केल्यास आदर्श समाज निर्मितीस हातभार लावला जातो. शिक्षण क्षेत्र हे पवित्र कार्यक्षेत्र आहे.
प्रा. प्रितम ओव्हाळ, प्रा. विलास शिंदे, प्रा. सचिनकुमार शहा, प्राचार्य महेंद्र बाजारे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त श्री. राजाराम राऊत, यांनी सेवापूर्ती गौरव समारंभात आपले मनॊगत व्यक्त केले. प्रा. संजीव पवार यांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व संपूर्ण पोशाख देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
प्रा. संजीव पवार यांचे सासवड हे गाव असून प्राथमिक ते पदवी पर्यंतचे शिक्षण त्यांनी याच ठिकाणी पूर्ण केले. सन १९९० पासून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात त्यांनी आपल्या शैक्षणिक सेवेचा प्रारंभ केला. शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान देताना अखंड सेवेची ३३ वर्षे त्यांनी पूर्ण केली.
आपल्या या सेवेच्या कार्यकाळात राष्ट्रीय व राज्यस्तरीय विविध खेळांमध्ये ३०० पेक्षा अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. या काळात महाविद्यालयातील एकूण ११ खेळाडूंना महाराष्ट्र राज्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.
प्रा. पवार सरांही वेगवेगळ्या संस्थांचा एकूण १० वेळा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्राप्त झाले आहेत. इयता ११ वी व इयत्ता १२ वी ‘आरोग्य आणि शारीरिक शिक्षण’ या शारीरिक शिक्षण विषयाच्या महाराष्ट्रातील पहिल्या पाठ्यपुस्तकाचे लेखन सरांनी केले आहे. वाहिन्यांवरील वेगवेगळ्या मालिका, तसेच मराठी व हिंदी भाषेतील अनेक चित्रपटातून त्यांनी सहाय्यक अभिनेता म्हणून भूमिका साकारल्या आहेत.
मास्टर्स गेम्स असोसिएशन, पुणे येथे सहसचिव पदी सर कार्यरत आहेत. तसेच नुकतीच त्यांची हडपसर विधानसभा शिक्षक सेल, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, पुणे शहर या राजकीय कार्यक्षेत्रात उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. खैरे एम.जे. यांनी केले. मानपत्र वाचन प्रा. भागवत भराटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नितीन लगड यांनी केले. आभार प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी केले.
सदर प्रसंगी प्रा. संजीव पवार यांचा जीवनपट बायोपिक च्या माध्यमातून उपस्थितांच्या समोर सादर करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे आजी-माजी राष्ट्रीय खेळाडू, जिमखाना कमिटी व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. नियोजनात श्रीकृष्ण थेटे, अमोल गायकवाड, धीरज सोनावणे, विशाल कोलते, संदीप भगत या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
Hadapsar News
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com