Publication of the book ‘Chakoribaherche Shikshan’ at Pune by the Governor
राज्यपालांच्या हस्ते पुणे येथे ‘चाकोरीबाहेरचे शिक्षण’ या पुस्तकाचे प्रकाशन
प्राचार्य संजय चाकणेंचे पुस्तक माणुस घडविण्याचे काम करेल – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
पुणे : महाराष्ट्राला साहित्याची समृद्ध परंपरा लाभली आहे. राज्यात साहित्यनिर्मितीसाठी उत्तम वातावरणदेखील आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
शिक्षण हे माणुस घडविणारे असले पाहीजे, चार भिंतींच्या आतमध्ये शिक्षण घेताना तो संवेदनशील झाला पाहीजे याकरिता या पुस्तकामध्ये छोटे छोटे प्रयोग दिले आहेत. यातूनच विद्यार्थ्यांचे माणुसपण सिध्द होणार आहे असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्राचार्य संजय चाकणे यांचे ‘चाकोरीबाहेरचे शिक्षण’ या पुस्तक प्रकाशनावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, पुस्तकाचे लेखक डॉ. संजय चाकणे आदी उपस्थित होते.
पुढे भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, इतर भाषेच्या तुलनेत मराठी भाषेतील साहित्य हे समृध्द आहे. या मराठी साहित्याने माणसांना घडविले आहे. अशा समृध्द साहित्यात प्राचार्य चाकणे यांच्या अतिशय महत्त्वाच्या पुस्तकात भर पडली आहे. हे पुस्तक शिक्षणाला योग्य दिशा देईल असा मला विश्वास आहे.
श्री. कोश्यारी म्हणाले, संत साहित्याने समाजाला मार्गदर्शन करण्याचे कार्य केले. मराठी वृत्तपत्रातून साहित्य, सांस्कृतिक, आर्थिक अशा विविध विषयांबाबत उत्तम लेखन पाहायला मिळते. उत्तम साहित्यनिर्मितीमुळे इथले ज्ञानभांडार विस्तारले आहे. अनेक लेखकांनी यात भर घालण्याचे कार्य केले.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू कारभारी काळे यांनी अशा प्रकारच्या साहित्याची समाजाला गरज असते असे प्रतिपादन केले.
यावेळी कृष्णकुमार गोयल यांनी नवनवीन प्रयोग शिक्षणामध्ये येणे गरजेचे आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये या पुस्तकाचा उपयोग होईल असे ते म्हणाले.
राजेश पांडे यांनी पुस्तकातील सहा प्रकरणांचा आढावा घेत अतिशय बारकाईने पुस्तक वाचले आहे आणि हे पुस्तक लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत उपयोगी होईल असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवंती चाकणे यांनी केले तर आभार डॅा. संजीव सोनवणे यांनी मानले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com