Publication of the book ‘Chanderi Sitare’
‘चंदेरी सितारे’ पुस्तकाचे प्रकाशन
थिएटर व्यावसायिकदृष्ट्या लोकप्रिय होण्यास थिएटर स्टार निर्माण व्हावेत -ज्येष्ठ कलावंत अंजन श्रीवास्तव
पुणे : थिएटर व्यावसायिकदृष्ट्या लोकप्रिय होण्यास थिएटर स्टार निर्माण व्हावेत त्यामुळे थिएटर अधिक समृद्ध होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ सिने नाट्य कलावंत अंजन श्रीवास्तव यांनी येथे केले. सिनेक्षेत्रातील मान्यवर कलावंतांच्या कार्य कर्तुत्वाची माहिती असलेल्या डॉ. राजू पाटोदकर लिखित ‘चंदेरी सितारे’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात बुधवारी झालेल्या या समारंभाच्या वेळी अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे निवृत्त संचालक श्रीनिवास बेलसरे तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट तसेच नावीन्य प्रकाशनचे नितीन खैरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
सिनेसृष्टी तसेच पत्रकारितेच्या आठवणी जागवताना अंजन श्रीवास्तव म्हणाले, प्रेक्षकांमुळे कलावंतांना ओळख मिळते. रंगमंच एक अशी बाब आहे जिथे कधी ना कधी आपली ओळख निर्माण होते. अशा यशस्वी कलावंतांवर ‘चंदेरी सितारे’ सारखी पुस्तके प्रकाशित व्हावीत असेही ते म्हणाले. हे पुस्तक हिंदी भाषेतही प्रकाशित व्हावे, अशी सूचना करुन पुस्तकास शुभेच्छा दिल्या.
पु.ल. हे भारताचे वैभव
यावेळी ते म्हणाले, मी पहिल्यापासून पुणे आणि पश्चिम बंगालला साहित्यनगरी समजतो. याच पुण्यातील आपले लाडके व्यक्तीमत्व पु.ल. देशपांडे हे केवळ पुणे, महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे वैभव आहे. तसेच’ वागळे की दुनिया ’ चे सर्वेसर्वा ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्याही भावपूर्ण आठवणींना त्यांनी उजाळा दिला. आर.के. हे व्यंगचित्रकार, पत्रकार आणि त्यापलीकडेही परिपूर्ण चित्रपट निर्माते होते, असे सांगून त्यांनी आपल्या 55 वर्षाच्या नाट्यक्षेत्रातील प्रवास, सिनेपत्रकार आणि प्रसिध्दीबाबत खास शैलीत विचार मांडले.
अनुभवाची दैनंदिनी लिहावी – सुधीर गाडगीळ
यावेळी बोलताना सुधीर गाडगीळ म्हणाले, ‘चंदेरी सितारे’ या पुस्तकाचे लेखक तथा पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर यांनी आपली प्रारंभीची पत्रकारिता प्रामुख्याने सिनेक्षेत्रात घालवली. सिनेपत्रकारिता करतांना त्यांनी अनेक कलाकारांच्या मुलाखती घेतल्या. तसेच महान अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील सामाजिक आशयावर त्यांनी पीएचडी केली. ही महत्वाची बाब आहे.
या पुस्तकात त्यांनी कलावंतांच्या वेगळ्या पैलूंवर लिखाण- भाष्य केलेले आहे हे चंदेरी सितारेचे वेगळे वैशिष्ट्य आहे. आपल्याला भेटलेल्या विविध लोकांबाबत त्यांच्याकडून येणाऱ्या अनुभवांची दैनंदिनी दररोज लिहावी असा सल्ला देतानाच आपल्या कारकिर्दीत घेतलेल्या विविध सिनेकलाकारांच्या मुलाखतीचे किस्सेही श्री. गाडगीळ यांनी यावेळी सांगितले.
चित्रपट हे कलावंतांना अमरत्व करणारे माध्यम – श्रीनिवास बेलसरे
सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्यातून गेलेल्या महान व्यक्तीरेखांना जीवंत करण्याचे, अमरत्व मिळवून देण्याचे अनोखे काम या माध्यमाद्वारे होते. सिने कलावंतांचा आपल्यावर मोठा प्रभाव पडत असतो. डॉ. पाटोदकर यांनी आपल्या मुलाखतींद्वारे पडद्यावरील कलाकार पडद्याबाहेर काढण्याचे काम केले आणि ते पुस्तकरुपी उतरविले अशा शब्दात श्री. बेलसरे यांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. पाटोदकर म्हणाले, पुस्तकात वर्णन केलेल्या 25 कलावंतांपैकी 20 कलावंतांना प्रत्यक्ष भेटलेलो असून त्यापैकी काहींबरोबर अभिनयाचे कामही केलेले आहे. हे कलावंत कलाकार म्हणून जसे मोठे आहेत त्याप्रमाणेच माणूस म्हणूनही वेगळे असल्याचे त्यांच्याबरोबर बोलताना, राहताना अनुभवले आहे, असेही डॉ. पाटोदकर म्हणाले. तसेच या क्षेत्रातील अनुभवावर आधारित 10 पुस्तके प्रकाशित करण्यात येतील. यात अमिताभ बच्चन यांच्यावरील पीएचडीच्या संशोधनावर आधारित महत्वाचे पुस्तक असल्याचे त्यांनी सांगितले.
‘चंदेरी सितारे’
शासकीय अधिकाऱ्याने लिखाणासाठी आपल्या व्यस्त दैनंदिन जबाबदाऱ्यातून वेळ काढणे ही वेगळीच बाब आहे. डॉ. पाटोदकर यांनी लिहिलेले सिनेसृष्टीतील आपल्या काळातील दिग्गज कलावंतांचे चरित्रलेख विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. त्यातील निवडक 25 कलाकार, दिग्दर्शकांचे चरित्र या पुस्तकात लिहिले आहे. त्यातील कलावंताशी भेटीदरम्यान कलावंतांची स्वभाववैशिष्ट्ये, संवेदनशीलता, साधेपणा आदींबाबतचे विविध अनुभव त्यांनी शब्दबद्ध केले आहेत.
दादासाहेब फाळके यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या सिनेमाच्या निर्मितीसाठी केलेल्या खटपटी आणि भारतातील चित्रसृष्टीची मुहूर्तमेढ, पहिला सिनेस्टार राजेश खन्ना यांच्या जीवनप्रवासाचे ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ असे केलेले वर्णन, डॉ. जब्बार पटेल यांची महानता, त्यांचा सिंहासन हा चित्रपट आणि त्यातील मुख्यमंत्र्यांची अफलातून भूमिका बजावलेले अरुण सरनाईक, ग्रामीण प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सहहृदयी दादा कोंडके, लोकप्रिय खलनायक ते चरित्र अभिनेता असा प्रवास केलेले प्राण, त्यासारखाच प्रवास असलेले विचारवंत कलावंत निळू फुले यांच्या निसर्गप्रेमाचे, वनौषधींविषयक ज्ञानाची माहिती असे अनेक किस्से या पुस्तकात वाचायला मिळतील. असे 25 महान कलावंतांचे चरित्र, त्यांच्याविषयीचे अनुभव या पुस्तकात आहेत.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com