Publication of the book “Shivchhatrapati’s Varsa – Swarajya te Samrajya”
“शिवछत्रपतींचा वारसा-स्वराज्य ते साम्राज्य” या पुस्तकाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते येत्या सोमवारी पुण्यात प्रकाशन
पुणे : शिवछत्रपतींचा वारसा – स्वराज्य ते साम्राज्य 1600 ते 1818 या डॉ. केदार फाळके लिखित पुस्तकाचे प्रकाशन येत्या सोमवारी (27 जून) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या शुभहस्ते होत असल्याची माहिती श्री शिवाजी मेमोरियल कमिटीचे उपाध्यक्ष उदय खर्डेकर व श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात, सदस्य श्रीनिवास कुलकर्णी यांनी आज येथे दिली.
सदर पुस्तक मराठी भाषेबरोबरच इंग्रजी भाषेतील (द लेगसी ऑफ छत्रपती शिवाजी – किंगडम टू एम्पायर 1600-1818) पुस्तक देखील प्रकाशित होत असून या दोन्ही आवृत्यांचे प्रकाशन यावेळी करण्यात येणार आहे. सामान्य वाचकांना मराठेशाहीचा इतिहास एकाच ग्रंथात उपलब्ध करून द्यावा या मुख्य हेतुने या ग्रंथाची निर्मिती केली आहे. अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषेत पुस्तक लिहिले आहे.
येत्या सोमवारी सायं. 7 वाजता पुणे-सातारा रस्त्यावरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात होणार्या या प्रकाशन समारंभास सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याबरोबरच भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, श्री शिवाजी मेमोरियल कमिटीचे कार्याध्यक्ष सुब्बा रेड्डी, सचिव जी. रघुरामय्या यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे, सरकार्यवाह पांडुरंग बलकवडे हे देखील व्यासपीठावर उपस्थित असतील.
आंध्रप्रदेशातील श्रीशैलम येथील श्री शिवाजी मेमोरियल कमिटीने हा समारंभ आयोजित केला असून श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ या समारंभाचे सहसंयोजक आहे.
सदर कार्यक्रमाच्या प्रवेशासाठी निमंत्रण पत्रिका असणे आवश्यक असून वेळेपूर्वी 15 मिनिटे उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com