Pune area will play an important role in the trillion dollar economy – Deputy Chief Minister Devendra Fadnavis
ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलर एवढी करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून ते साध्य करायचे असेल तर महाराष्ट्रालाही ट्रिलीअन डॉलर अर्थव्यवस्था व्हावी लागेल. राज्याच्या ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत मराठा चेंबर्स आणि पुण्यातील औद्योगिक परिसराची मोठी भूमिका राहील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्स्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर पुणे संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी एमसीसीआयएचे माजी अध्यक्ष प्रतापराव पवार, मराठा चेंबर्सचे अध्यक्ष सुधीर मेहता, नियोजित अध्यक्ष दिपक करंदीकर, एमसीसीआयएचे महासंचालक प्रशांत गिरबाने आदी उपस्थित होते.
श्री.फडणवीस म्हणाले, एमएमआरडीए आणि पीएमआरडीए या दोन भागांत मोठा विकास अपेक्षित आहे. पुणे हे औद्योगिक उत्पादनाचे महत्त्वाचे केंद्र आहे. इथून मोठ्या प्रमाणात निर्यातही होते. पुण्याने नुकत्याच जाहीर झालेल्या ‘ग्लोबल स्टार्टअप इंडेक्स’ मध्ये ‘स्टार्टअप इकोसिस्टीम’च्या रुपात आपले महत्त्वाचे नाव प्राप्त केले आहे. आपल्याला यापेक्षाही अधिक प्रगती करायची आहे.
महाराष्ट्र देशातील स्टार्टअपचे केंद्र आहे आणि पुणे हे महाराष्ट्रातील स्टार्टअपचे प्रमुख केंद्र आहे. देशातील ८० हजारातील १५ हजार स्टार्टअप्स महाराष्ट्रात आहेत. देशातील १०० युनिकॉर्नपैकी २५ युनिकॉर्न महाराष्ट्रात आहेत. राज्यात अशा उद्योगांसाठी आवश्यक औद्योगिक वातावरण निर्माण झाले आहे. या उद्योगाभिमुख वातावरणाला पुढे कसे नेता येईल, याचा विचार व्हावा. आपण उद्योगकेंद्रीत धोरण राबविले तर आपण अधिक पुढे जाऊ शकतो. त्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासावर अधिक भर द्यावा लागेल.
रिंगरोड पुण्याच्या विकासाचे इंजिन ठरेल
पुण्यातील रिंगरोड पुण्याच्या पुढील १० वर्षाच्या विकासाला चालना देईल. रिंगरोडसाठी ३० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून हा मार्ग येत्या १० वर्षात १ ते १० लाख कोटींचे मूल्य तयार करणारा ठरेल. हा रिंगरोड पुण्याच्या विकासाचे इंजिन ठरेल. या मार्गाच्या भूमी अधिग्रहणासाठी तज्ज्ञांकडून नाविन्यपूर्ण कल्पना आल्यास त्यांचे स्वागत केले जाईल. पुण्यात मेट्रो रेल्वेच्या दोन टप्प्याचे काम वेगाने पुढे जात आहे. पुण्यातील औद्योगिक वातावरण पाहता पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर १०० टक्के विद्युत वाहनाचा किंवा पर्यायी इंधनाचा उपयोग करणारे पहिले शहर व्हावे.
पुरंदर येथे विमानतळासोबत लॉजीस्टिक हब
पुण्याच्या आर्थिक विकासात पुणे विमानतळाचे मोठे योगदान आहे. जगातील प्रमुख देश पुण्याशी जोडले गेले आहेत. पुणे येथून विमानाच्या फेऱ्या वाढविण्याची गरज आहे. सद्ध्याचे विमानतळ एका मर्यादेहून अधिक क्षमतेने चालणं शक्य नसल्याने पुण्यासाठी नवे विमानतळ तयार करणे आवश्यक आहे. पुरंदर येथे नवे विमानतळ उभारण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. येथे विमानतळासोबत कार्गो आणि लॉजीस्टिक पार्क उभारण्याचाही विचार करण्यात येत आहे. नवी मुंबई विमानतळाला पुण्याशी जोडले जाईल, यामुळे पुण्याला त्याचा फायदा होईल.
महाराष्ट्रात औद्योगिक वातावरण टिकवून ठेवणं गरजेचे
महाराष्ट्रात येणारी परदेशी गुंतवणूक सातत्याने वाढत आहे. महाराष्ट्र देशातील इतर राज्यांच्या पुढे आहे. येत्या वर्षभरात गुंतवणुकीत महाराष्ट्र परत एकदा प्रथम क्रमांकावर असेल. शासनाने रस्ते, मेट्रो आणि दळणवळणांच्या इतर माध्यमांना बळकट करण्यात विशेष लक्ष दिले आहे. वेगाने विकास करताना महाराष्ट्रात औद्योगिक वातावरण टिकवून ठेवणं गरजेचे आहे. कामगारांना संरक्षण मिळायलाच हवे, मात्र खोट्या माथाडी कामगारांवर कारवाई सुरू करण्यात येणार आहे. औद्योगिक विकासासाठी उद्योगांना संरक्षण द्यावेच लागेल.
औद्योगिक विकासात एमसीसीआयएची महत्वाची भूमिका
पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या विकासात मराठा चेंबर्सची महत्त्वाची भूमिका आहे. पुढील काळात ‘फिनटेक’ क्षेत्रात पुण्यात आणण्याचा प्रयत्न करावा लागेल, त्यासाठी मराठा चेंबर्सची भूमिका महत्त्वाची असेल. या संस्थेचे एक व्हिजन असून सातत्याने संस्थेने शासनाला विविध संदर्भात मार्गदर्शन केले आहे. शासन मराठा चेंबर्सच्या उपक्रमाला सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
उपमुख्यमंत्र्यांनी औद्योगिक प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. पुणे शहरात रस्त्यांचा दर्जा उन्नत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. वाहतुकीचे सुयोग्य नियोजन करण्यावर भर देण्यात आला आहे. येत्या काळात पुण्यात चोवीस तास पाणी पुरवठा योजना सुरू होत असून त्यामुळे पाण्याचा अपव्यय टळेल. भविष्यात धरणातील पाणी थेट उद्योगांना न देता ते नागरिकांना आणि शेतीला दिले जाईल आणि शुद्धीकरण केलेले पाणी उद्योगांना दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. पुण्याच्या शैक्षणिक संस्था आयआयटी आणि आयआयएम एवढ्याच उत्तम दर्जाचे शिक्षण देणाऱ्या आहेत, असेही ते म्हणाले.
श्री.करंदीकर यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. लहान आणि मध्यम उद्योगांनी देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या उद्योगांमध्ये हरित ऊर्जेचा उपयोग वाढविण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले.
श्री.मेहता म्हणाले, मराठा चेंबर्सने पुण्यातील आरोग्य सुविधांचे सक्षमीकरण करण्यासाठी सहकार्य केले आहे. शासनाच्या सोबतीने पुढील तीन वर्षात पुणे देशातील सर्वात स्वच्छ शहर करण्याचा प्रयत्न राहील. पुणे शहरात शिक्षण, विद्युत वाहन, वैद्यकीय सुविधेचे जागतिक केंद्र बनण्याची क्षमता आहे, असे त्यांनी सांगितले. राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी शासनाला सर्व सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रास्ताविकात श्री.पवार यांनी राज्यात मोठे उद्योग यावेत यासाठी मराठी चेंबर्सचे सहकार्य राहील असे सांगितले.
श्री.गिरबाने यांनी एमसीसीआयएच्या कार्याविषयी माहिती दिली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘मिशन वायू’ अहवाल आणि मराठा चेंबर्सच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com