Pune’s contribution to Marathi literature is great
मराठी साहित्यात पुण्याचे योगदान मोठे
-अरविंद पाटकर
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
मराठी साहित्यात लोकभाषा ही तेथील संस्कृती असते
पुणे : पुणे जिल्ह्याला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, शिवाजी महाराज यांच्या साहित्याची परंपरा असून ग. प्र.प्रधान, जयंत नारळीकर, ग.दि.माडगूळकर, बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या लेखकांची परंपरा लाभली आहे. त्यामुळेच या पुण्याचे मराठी साहित्यात मोठे स्थान आहे असे मत मनोविकास प्रकाशनचे प्रकाशक अरविंद पाटकर यांनी व्यक्त केले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्याचे साहित्यिक व भाषिक योगदान या विषयावर पाटकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्र- कुलगुरू डॉ संजीव सोनवणे, भाषा संचालक विजया डोनिकर , सहसंचालक शरद यादव विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख डॉ.प्रभाकर देसाई उपस्थित होते.
राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे. या उपक्रमांतर्गत ३६ जिल्हे ३६ व्याख्याने होणार असून त्यातील पुण्यातील व्याख्यान २५ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झाले.
पाटकर म्हणाले, सुरवातीला मराठी वाचन संस्कृती पेठ परिसरात मर्यादित दिसत परंतु आता तसे चित्र नाही. ललित साहित्याची उत्तम पुस्तके असणारी विक्री केंद्र खूप कमी आहेत. राज्यात वीस जिल्हे असे आहेत जिथे चांगले साहित्य उपलब्ध असणारी दुकाने नाहीत तर एकट्या पुण्यात अशी दहा ते बारा दुकाने आहेत असेही पाटकर यांनी यावेळी सांगितले.
डॉ.संजीव सोनवणे म्हणाले, विद्यापीठातील मराठी भाषा विभागाचे देखील योगदान मराठी साहित्यात मोठे आहे. विद्यापीठात लवकरच भाषा भवन सुरू होणार असून त्यातून मराठी भाषा संवर्धनाचे अनेक उपक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे.
मराठी साहित्यात लोकभाषा ही तेथील संस्कृती असते त्याचेही जतन होणे गरजेचे असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com