Quality availability of health, education and infrastructure is important in the development of the state
राज्याच्या विकासात आरोग्य, शिक्षण व पायाभूत सुविधांची दर्जेदार उपलब्धता महत्त्वाची – राज्यपाल रमेश बैस
सातारा : राज्याच्या सर्वांगीण विकासात आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांची दर्जेदार उपलब्धता महत्त्वाची ठरते. त्यादृष्टीने शासकीय यंत्रणांनी विकासकामे करण्याच्या सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केल्या.
राजभवन महाबळेश्वर येथे जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांसोबत आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
पाणी जीवनासाठी अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगून राज्यपाल श्री. बैस म्हणाले, फार पूर्वीपासून मानवी वसाहती या पाण्याच्या काठी वसल्या आहेत. आजही पाण्याच्या काठीच शहरे विकसित होत आहेत.
अलीकडे वातावरण बदलामुळे पाण्याच्या उपलब्धतेची परिस्थिती बदलत आहे. याचा विचार करून जलसंधारणाची कामे करावीत. महाबळेश्वरच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. पावसाचे पाणी छोट्या छोट्या तलावांमध्ये साठवावे. प्रत्येक गावात लहान लहान तलाव बांधावेत. या तलावांमध्ये साठवलेले पाणी जमिनीत मुरून भूजल पातळी उंचावण्यास मदत होते. तसेच या पाण्याचा वापर ग्रामस्थांच्या दैनंदिन वापरासाठीही होतो. डोंगर उतारावर पाणी अडवण्यासाठी छोटे छोटे बंधारे बांधावेत, याबाबत नेहमीच्या पठडीतील काम न करता थोडा वेगळा विचार करून काम केल्यास लोकांना चांगल्या सुविधा देता येतील, असेही राज्यपाल श्री. बैस यांनी सांगितले.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा आढावा घेऊन राज्यपाल श्री. बैस म्हणाले, या आरोग्य योजनेमध्ये खासगी रुग्णालयांकडून करण्यात येणाऱ्या बिलांची पडताळणी करावी.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ द्यावा. कृषी प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. या प्रक्रिया उद्योगांमुळे शेतकऱ्यांना कृषी मालाला जास्तीचा भाव मिळण्यास मदत होणार आहे. तसेच एखाद्या वेळी बाजारात कमी भाव असल्यास कृषी मालाची साठवणूक करून भाव चांगला मिळाल्यावर तो बाजारात विकता येईल अशा प्रकारच्या सुविधा उभारव्यात. चाकोरी बाहेर जाऊन चांगले काम करून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी जिल्ह्यातील विविध विभागांकडील योजनांचा सादरीकरणाद्वारे सविस्तर आढावा सादर केला. तसेच जलयुक्त शिवार योजनेचाही आढावा राज्यपाल श्री. बैस यांनी घेतला.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com