Rahul Gandhi’s candidature canceled
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाकडून रद्द
मानहानी प्रकरणी शिक्षेनंतर संसद भवनातून सर्वात मोठी कारवाई
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्षांनी घेतला
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयानं कालपासून रद्द केली आहे. यासंदर्भातली अधिसूचना लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंह यांनी आज जारी केली. सूरतमधल्या न्यायालयानं काल राहुल गांधी यांना दोषी ठरवून २ वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळं राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.
लोकसभा सचिवालयाने यासंदर्भात काढलेल्या आदेशामध्ये राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाबाबत माहिती देण्यात आली आहे. सचिव उत्पल कुमार सिंह यांच्या नावाने हे पत्र राहुल गांधी, राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालय, राज्यसभा, निवडणूक आयोग तसंच सर्व मंत्रालय/विभागांना पाठवण्यात आलं आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्षांनी घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा झटका मानला जात आहे. मोदी या आडनावाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात दोषी ठरल्यानंतर राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आता राहुल गांधी यांच्यावर लोकसभा अध्यक्षांकडून अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे.
भारतीय संविधानातील लोकप्रतिनिधी कायदा, 1951 मधील कलम 10 (1) (e) अन्वये राहुल गांधी यांची खासदारकी 23 मार्च 2023 पासून रद्द करण्यात येत असल्याचं सांगितलं आहे. सुरत कोर्टाने एका अब्रूनुकसानीच्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांच्यावर ही कारवाई केली.
राहुल गांधी यांनी 2019 मध्ये त्यांनी मोदी आडनावावरुन एक टिप्पणी केली होती. यामध्ये दोषी मानून कोर्टाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. राहुल गांधी हे केरळच्या वायनाड येथून खासदार होते. मात्र, सुरत कोर्टाच्या निकालानंतर आता लोकसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांना आपली खासदारकी गमावावी लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही राहुल गांधी यांना पाठिंबा दिला आहे. राहुल यांना तुरूंगवासाची शिक्षा म्हणजे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मुलभूत हक्क, लोकशाही अभिव्यक्ती आणि बोलण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. वारंवार देशातील राजकीय पक्षांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक केले.
उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर केंद्र सरकारवर अत्यंत तिखट भाषेत टीका केली आहे. राहुल गांधी यांची खासदारकी अखेर रद्द करण्यात आली. चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत आणि राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचे हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे. फक्त लढाईला दिशा द्यावी लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
खासदार संजय राऊत
तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही राहुल गांधी यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर ट्विट करुन आपले मत मांडले. ज्या न्यायालायने राहुल गांधी यांना शिक्षा सुनावली ते न्यायालय गुजरातमध्ये आहे. त्यामुळे मला काहीही बोलायचे नाही. राहुल गांधींना शिक्षा सुनावल्यानंतर विरोधी पक्ष घाबरतील, मैदान सोडून पळ काढतील, असे कोणाला वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. आम्ही संघर्ष करु, असे संजय राऊत यांनी म्हटले.
पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया
यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जी कारवाई झाली ते सूडाचं राजकारण आहे. नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेला घाबरले आहेत, यामुळे त्यांनी अघोषित आणीबाणी लागू केली आहे. काँग्रेस पक्षाला आणि राहुल गांधी यांना मिळत असलेली लोकप्रियता पाहला त्यांचा आवाज बंद करण्यासाठी हा प्रयत्न झाला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया
सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच उच्च न्यायालयात अपील करण्याची मुभा दिलेली आहे. राहुल गांधी यांनी जाहीर केलेले आहे ते अपील करणार आहेत. असे असताना भाजपच्या सरकारने तातडीने त्यांची खासदारकी रद्द करणे चुकीचे आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. सरकारने किमान उच्च न्यायालयाय ती ऑर्डर रद्द करते का याची वाट बघायला पाहिजे होती. उच्च न्यायालयाने ऑर्डर रद्द नसती केली तर सरकारने आपला अधिकार वापरला असता तर योग्य झाले असते. मात्र आता केवळ द्वेष भावना असल्याचे याठिकाणी दिसत आहे
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधिमंडळाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी व लोकशाही विरोधी असल्याचा आरोप केला. ‘नरेंद्र मोदी सरकारने लोकसभा अध्यक्षांच्या माध्यमातून आज राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. हा लोकशाहीविरोधी निर्णय आहे. मेहुल चोकशी, नीरव मोदी, ललित मोदी आदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हजारो कोटींचा चुना लावून देशातून पळून गेलेत. राहुल गांधी यांनी याविरोधात आवाज बुलंद करत आहेत. पण त्यांचा आवाज दाबला जात आहे,’ असे पटोले म्हणाले.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या आडनावाप्रकरणी केलेल्या विधानाप्रकरणी सुरत न्यायालयात खोटा खटला दाखल करण्यात आला. त्यानंतर आता राहुल गांधींचे संसद सदस्यत्व रद्द करण्याचे पाप सरकारने केले. सरकारने ही कारवाई ठरवून केली. भाजप देशात लोकशाही विरोधी व्यवस्था तयार करण्याचे काम करत आहे. हे संविधान विरोधी कृत्य असून, काँग्रेस हा लढा रस्त्यावर उतरून लढेल,’ असेही पटोले यावेळी म्हणाले.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी विधानसभेतून सभात्याग केला. राहुल गांधींची खासदारकी रद्द करणे अत्यंत दुर्दैवी व लोकशाही विरोधी घटना आहे. हा विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रकार आहे, असा आरोप या पक्षांनी या प्रकरणी केला.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी या कारवाईच्या निषेधार्थ सभात्याग
या कारवाईमुळे अवघ्या देशाचे राजकारण पेटले आहे. त्याचे पडसाद शुक्रवारी विधानसभेतही उमटले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी या कारवाईच्या निषेधार्थ सभात्याग केला. त्यानंतर विधानसभेच्या पायऱ्यांवर या कारवाईच्या निषेधार्थ जोरदार नारेबाजी केली.
भाजपचा अत्यंत आक्रमक पवित्रा
कोर्टाचा निर्णय आल्यानंतर कालपासून भाजपविरोधात काँग्रेसने आंदोलनं केली होती. मात्र, संसदेत अदानी प्रकरणावरुन आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे.
राहुल गांधी यांच्या परदेशातील एका वक्तव्याविरोधात भाजपचे खासदार गेल्या आठवडभरापासूनच संसदेत आक्रमक झाले होते. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेतील कामकाज अनेकदा तहकूब झाले होते. अशातच सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवून दोन वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, उच्च न्यायालायत अपील करण्यासाठी राहुल गांधी यांना ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यासाठी राहुल गांधी यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.
सुरुवातीला भाजपकडून ‘पप्पू’ अशी हेटाळणी होणाऱ्या राहुल गांधी यांनी गेल्या काळात भाजपला सातत्याने जेरीस आणले आहे. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी राहुल गांधी यांनी दिलेली’चौकीदार चोर है’ही घोषणा अत्यंत गाजली होती.
अलीकडेच राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. भारत जोडो यात्रेमुळे लोकांना राहुल गांधी यांचे नवे रुप पाहायला मिळाले होते. राजकीयदृष्ट्या ही यात्रा अत्यंत यशस्वी ठरली होती. त्यामुळे राहुल गांधी यांची लोकप्रियता कमालीची वाढली होती.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही राहुल गांधी यांनी अदानींचा मुद्दा उपस्थित करत भाजपला कोंडीत पकडले होते. राहुल गांधी सातत्याने लोकसभेत मोदी आणि अदानी यांचा एकत्रित उल्लेख करत होते. काँग्रेसकडून सभागृहात ‘मोदी अदानी भाई-भाई’ अशा घोषणाही देण्यात आल्या होत्या. या सगळ्यामुळे राहुल गांधी हे सभागृहात भाजपसाठी डोकेदुखी ठरत होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com