‘सुरत’ ‘उदयगिरी’या स्वदेशी बनावटीच्या युद्धनौकांचे जलावतरण

Raksha Mantri launches two indigenous frontline warships – Surat (Guided Missile Destroyer) & Udaygiri (Stealth Frigate) – in Mumbai

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत ‘सुरत’ (मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिका) आणि ‘उदयगिरी'(स्टेल्थ लढाऊ जहाज ) या दोन स्वदेशी बनावटीच्या आघाडीच्या युद्धनौकांचे मुंबईत जलावतरण

”जगाला भारताचे सामरिक सामर्थ्य आणि आत्मनिर्भरतेचे दर्शन घडवणाऱ्या या युद्धनौका ”

नवी दिल्ली/मुंबई :  स्वदेशी युद्धनौका निर्मितीच्या  इतिहासात आज देश एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार झाला. संरक्षण  मंत्री राजनाथ सिंह  यांच्या  उपस्थितीत भारतीय नौदलाच्या दोन आघाडीच्या युद्धनौका  प्रोजेक्ट 15B श्रेणीतील मार्गदर्शित क्षेपणास्त्र  विनाशिका   ‘सुरत’ , आणि प्रोजेक्ट 17A श्रेणीतील  ‘उदयगिरी’, या स्टेल्थ लढाऊ जहाजाचे  आज  मुंबईतील माझगाव डॉक्स लिमिटेड  येथे एकाच वेळी जलावतरण  झाले.Raksha Mantri launches two indigenous frontline warships 'सुरत' 'उदयगिरी'या स्वदेशी बनावटीच्या युद्धनौकांचे जलावतरण हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

प्रोजेक्ट 15B श्रेणीतील जहाजे ही मुंबईतील  माझगाव डॉक्स लिमिटेड  येथे तयार करण्यात आलेली  भारतीय नौदलाची अद्ययावत स्टेल्थ मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिका आहेत.

संरक्षणमंत्र्यांनी  आपल्या भाषणात या युद्धनौकांचे वर्णन देशाच्या सागरी क्षमता वाढविण्याच्या सरकारच्या अटल वचनबद्धतेचे मूर्त स्वरूप असे  केले.  रशिया -युक्रेन संघर्ष आणि कोविड-19मुळे जागतिक पुरवठा साखळीत व्यत्यय येत असताना  भारताने  ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्यावर लक्ष केंद्रित केले. महामारी असूनही  जहाज निर्मिती  सुरू ठेवून  सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीत भारतीय नौदलाच्या धोरणात्मक गरजा पूर्ण केल्याबद्दल त्यांनी माझगाव डॉक्स लिमिटेडचे अभिनंदन केले.

या दोन युद्धनौका भारतीय नौदलाच्या शस्त्रागाराचे  सामर्थ्य वाढवतील आणि भारताच्या सामरिक सामर्थ्याचे तसेच आत्मनिर्भरतेच्या सामर्थ्याचे प्रतिनिधित्व करतील,असे राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले.

जागतिक सुरक्षा, सीमा विवाद आणि सागरी वर्चस्व यामुळे जगभरातील राष्ट्रांना त्यांच्या सैन्याचे आधुनिकीकरण करणे भाग पडत आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्र्यांनी केले. सरकारच्या धोरणांचा फायदा घेऊन क्षमतांचा पुरेपूर वापर करून भारताला  स्वदेशी जहाज बांधणी केंद्र बनवण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांना केले.

स्वदेशी जहाजे, पाणबुड्या इत्यादींच्या निर्मितीद्वारे स्वावलंबन सुनिश्चित करण्यात भारतीय नौदल नेहमीच आघाडीवर असल्याचे कौतुक राजनाथ सिंह यांनी केले.

नौदलाच्या परंपरेनुसार, नेव्ही वाईव्हज वेलफेयर  असोशिएशन(पश्चिम क्षेत्र)च्या  अध्यक्षा श्रीमती चारू सिंग आणि माझगाव डॉक्स लिमिटेडच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांच्या पत्नी श्रीमती जयश्री प्रसाद यांनी शुभेच्छा देत  जहाजांचे अनुक्रमे ‘सुरत’ आणि ‘उदयगिरी’ असे नामकरण केले. नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार आणि भारतीय नौदल आणि संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सुरत‘ आणि उदयगिरी‘, यांच्याविषयी

‘सुरत’ ही  प्रोजेक्ट 15B या  श्रेणीतील  चौथी विनाशिका आहे,  ज्याची निर्मिती P15A (कोलकाता श्रेणी )  विनाशिकेत महत्त्वपूर्ण बदल करून केली आहे. गुजरातची आर्थिक राजधानी आणि मुंबई पाठोपाठ पश्चिम भारतातले दुसऱ्या क्रमांकाचे व्यावसायिक केंद्र असलेल्या सुरत शहराच्या नावावरून या विनाशिकेचे  नाव ठेवण्यात आले आहे. सुरत शहराला  समृद्ध सागरी आणि जहाज बांधणीचा इतिहास आहे आणि 16व्या आणि 18व्या शतकात शहरात बांधलेली जहाजे त्यांच्या प्रदीर्घ सेवेसाठी  (100 वर्षांपेक्षा जास्त) ओळखली जात होती.

सुरत ही  विनाशिका ब्लॉक बांधकाम पद्धती वापरून तयार केली  गेली  आहे, ज्यामध्ये दोन वेगवेगळ्या भौगोलिक स्थानांवर नौकेच्या सांगाड्याचे बांधकाम झाले  आणि माझगाव डॉक लिमिटेड , मुंबई येथे ते एकत्र जोडले गेले आहे. या श्रेणीतील  पहिली विनाशिका 2021 मध्ये कार्यान्वित झाली . दुसऱ्या  आणि तिसऱ्या विनाशिकांचे  यापूर्वीच जलावतरण  झाले असून  त्या चाचण्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत.

आंध्र प्रदेशातल्या पर्वतरांगांवरून ‘उदयगिरी’ या फ्रिगेट  युद्धनौकेचे नामकरण करण्यात आले आहे.  ही प्रोजेक्ट 17A श्रेणीतील  तिसरी   फ्रिगेट युद्धनौका  असून  सुधारित स्टेल्थ वैशिष्ट्ये, प्रगत शस्त्रे आणि सेन्सर्स आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणालीसह  P17 फ्रिगेट  (शिवालिक श्रेणी ) नुसार याची बांधणी केली आहे.

‘उदयगिरी’ हे  पूर्वीच्या लिअँडर क्लास एएसडब्ल्यू फ्रिगेट ‘उदयगिरी’चे नवे रूप  आहे, जे 18 फेब्रुवारी 1976 ते 24 ऑगस्ट 2007 या तीन दशकांत आपल्या गौरवशाली सेवेत  देशासाठी असंख्य आव्हानात्मक मोहिमांमध्ये  सहभागी होते.

प्रोजेक्ट 17A कार्यक्रमांतर्गत सात युद्धानौकांपैकी 4 माझगाव डॉक लिमिटेड( एमडीएल) इथे आणि 3 जीआरएसई  येथे निर्माणाधीन आहेत. प्रोजेक्ट 17A प्रकल्पातील पहिल्या दोन युद्धानौकांचे  2019 आणि 2020 मध्ये अनुक्रमे एमडीएल आणि जीआरएसई  येथे जलावतरण करण्यात आले .

प्रोजेक्ट 15B आणि प्रोजेक्ट 17A या दोन्ही युद्धानौकांची रचना नौदल आरेखन  संचालनालयाने (DND) केली आहे, जे  देशातील सर्व युद्धनौकांच्या संरचनेचे काम पाहते. कारखान्यात उभारणीच्या टप्प्यात असताना उपकरणे आणि अन्य प्रणालीच्या सुमारे 75% ऑर्डर्स एमएसएमईसह स्वदेशी कंपन्यांना देण्यात आल्या. देशातील ‘आत्मनिर्भरतेचे ‘ हे ठळक उदाहरण आहे.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *