RBI announces launch of first pilot for retail digital Rupee on 1st December
देशात किरकोळ व्यवहारात डिजिटल-रुपी चलनाचा वापर प्रायोगिक तत्त्वावर गुरूवारपासून सुरू होणार
मुंबई : देशात किरकोळ व्यवहारात डिजिटल-रुपी चलनाचा वापर प्रायोगिक तत्त्वावर परवापासून सुरू होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
घाऊक व्यवहारांमध्ये १ नोव्हेंबरपासून डिजिटल रुपीचा प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू झाला आहे. सुरुवातीला मुंबई, नवी दिल्ली, बेंगळुरू आणि भुवनेश्वर या शहरांमध्ये हे व्यवहार सुरू होतील आणि नंतर अहमदाबाद, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इंदूर, कोची, लखनौ, पाटणा आणि शिमला या शहरांचा विस्तार करेल. आवश्यकतेनुसार अधिक बँका, वापरकर्ते आणि स्थाने समाविष्ट करण्यासाठी सहभागाची व्याप्ती हळूहळू वाढविली जाऊ शकते.
सध्या निवडक व्यक्ती आणि व्यापारी या व्यवहारात सहभागी होणार आहेत. सध्या चलनात असलेल्या नोटा आणि नाण्यांची डिजिटल टोकन या व्यक्तींच्या डिजिटल वॉलेटमध्ये बँकांकडून हस्तांतरित केली जातील.
वॉलेटमधलं हे डिजिटल चलन वापरुन एका व्यक्तीच्या खात्यातून दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात रक्कम हस्तांतरित करता येईल किंवा यात सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांकडून वस्तू खरेदीसाठी वापरता येईल.
मोबाइल फोन किंवा तत्सम इतर साधनांद्वारे हे व्यवहार करता येतील. हा डिजिटल रुपया चलनी नोटा आणि नाण्यांइतकाच सुरक्षित, विश्वासार्ह, असल्याचं रिझर्व्ह बँकेनं या पत्रकात म्हटलं आहे.
या प्रायोगिक चाचणीमध्ये डिजिटल रुपयाची निर्मिती, वापर आणि वितरणाची यंत्रणा तपासली जाईल. सध्या स्टेट बँक, ICICI बँक, येस बँक आणि IDFC फर्स्ट बँक या चाचणीमध्ये सहभागी होणार आहेत. बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक यासह आणखी चार बँका पुढे या चाचणीमध्ये सामील होतील.
आगामी काळात अधिकाधिक नागरिक, व्यापारी, बँका आणि शहरांमध्ये ही प्रायोगिक चाचणी सुरू होईल.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com