Scheme for supply of mini tractors to registered self-help groups of scheduled castes
अनुसूचित जातीच्या नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर पुरवठा योजना
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांचा पुरवठा करणे ही योजना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे.
२०२२-२३ या आर्थिक वर्षाकरीता गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी किंवा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडे नोंदवलेल्या आणि राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या पात्र बचत गटांच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत ३ लाख १५ हजार रुपये मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी केल्यानंतर जमा करण्यात येतात.
स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे. बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रुपये ३ लाख ५० लाख हजार राहील. नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांनी कमाल मर्यादा रकमेच्या १० टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर ९० टक्के शासकीय अनुदान अनुज्ञेय राहिल. ठरवून दिलेल्या उद्दीष्टापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल. योजनेअंतर्गत ९ ते १८ अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टिव्हेटर किंवा रोटव्हेटर ट्रेलर खरेदी करता येईल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसहित विहित नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, डॉ.बाबासाहेव आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी रोड, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोर, येरवडा पुणे- ४११०१५ (दूरध्वनी क्र. ०२०-२९७०६६११) येथे पंधरा दिवसाच्या आत प्रत्यक्ष सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त संगीता डावखर यांनी केले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com