मतदार यादी निर्दोष करण्यावर आणि नव युवा मतदार नोंदणीवर सर्वाधिक भर द्या

Election Commision of India

Emphasis on decriminalization of electoral roll and registration of new youth voters

मतदार यादी निर्दोष करण्यावर आणि नव युवा मतदार नोंदणीवर सर्वाधिक भर द्या – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भारत निवडणूक आयोगाचा भर

महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी ६१ टक्के असून ती राष्ट्रीय सरासरीपेक्षा (६७ टक्के) कमीElection Commission of India हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

पुणे : आगामी निवडणुकीमध्ये मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मतदार याद्या अचूक आणि निर्दोष करण्यावर तसेच नव युवा मतदार नोंदणीवर सर्वाधिक भर द्यावा. मयत मतदारांची वगळणी, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, दुबार मतदार वगळणी यावर विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले.

यशदा येथे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आयोजित राज्यातील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. देशपांडे बोलत होते. यावेळी भारत निवडणूक आयोगाचे स्वीप संचालक संतोष अजमेरा, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपसचिव तथा सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर आदी उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, आगामी वर्ष निवडणुकांचे असल्याने निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक तयारी करायची आहे. भारत निवडणूक आयोगाने यापूर्वीच याबाबत सर्व तयारी सुरू केली आहे. आयोगाने सर्व मतदार संघातील कायदा व सुव्यवस्था, मतदान केंद्रांची तयारी, संवेदनशील मतदान केंद्र निश्चिती आदींचा यापूर्वीच आढावा घेतलेला आहे. त्यामुळे सर्व यंत्रणेने, प्रशासनाने आयोगाच्या सूचनांचे बारकाईने अवलोकन करावे.

मतदान यंत्रणेसाठी आवश्यक सर्व साधन सामग्रीचे व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन आदींसाठी सक्षम अधिकारी, मनुष्यबळ जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी नेमावे. निवडणूक यंत्रणेवर दोषारोप होऊ नयेत यासाठी अत्यंत काळजीपूर्वक काम करावे. त्यासाठी मतदार यादी अचूक, निर्दोष असेल याकडे सर्वाधिक लक्ष द्या. मतदान केंद्रांसाठी मनुष्यबळ नेमताना ते निष्पक्ष असतील याची खात्री करा, असेही श्री. देशपांडे म्हणाले.

मतदार यादी निर्दोष करण्यासाठी मयत मतदारांची वगळणी, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, दुबार मतदार वगळणी याला सर्वाधिक महत्व द्यावे. मतदार यादीमध्ये अस्पष्ट छायाचित्रांचे प्रमाण २६ टक्के असून ८० वर्षे वयावरील मतदारांचे प्रमाण २३ टक्के आहे. याची योग्य पडताळणी करून मयत मतदारांची वगळणी, मतदार यादीमध्ये अस्पष्ट छायाचित्रे असलेले मतदार याची दुरुस्ती करायची आहे. तसेच संभाव्य नवीन मतदारांचा समावेश करण्यासाठी विशेष संक्षिप्त पूनरिक्षण कार्यक्रम अचूक राबवावा. ही सर्व कार्यवाही विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून करावी. असे केल्यास निश्चितपणे मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ होईल.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भारत निवडणूक आयोगाचा भर आहे. महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी ६१ टक्के असून ती राष्ट्रीय सरासरीपेक्षा (६७ टक्के) कमी असल्यामुळे मतदान टक्केवारी वाढीसाठी प्रयत्न करावा. राज्यातील ४७ विधानसभा मतदार संघातील मतदान टक्केवारी राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त असून इतर सर्व मतदार संघात कमी आहे. त्यामुळे या मतदार संघातील मतदान टक्केवारीचे प्रमाण वाढविण्यासाठी वास्तवदर्शी आराखडा (टर्नआऊट इम्प्रूव्हमेंट प्लॅन – टीआयपी) तयार करावा.

संक्षिप्त पुनरिक्षण मोहिमेत गावपातळीवर पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांची भागनिहाय याद्या तपासणीसाठी मदत घ्यावी. युवा मतदार नोंदणीसाठी उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये यांच्याशी समन्वय साधून मदत घ्यावी. शक्य तेथे महाविद्यालय प्रवेशवेळी मतदार नोंदणीचे अर्ज विद्यार्थ्यांकडून भरून घेतल्यास चांगले काम होऊ शकेल. यादृष्टीने पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्याने चांगले काम केले आहे. तसे इतरही जिल्ह्यात व्हावे.

सर्व राजकीय पक्षांना आपले मतदान केंद्रस्तरीय एजंट (बीएलए) नेमण्यासाठी आवाहन करावे. शहरी भागात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना घरोघरी भेटी देण्यासाठी बीएलए यांचीही मदत घ्यावी, असेही यावेळी ते म्हणाले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

One Comment on “मतदार यादी निर्दोष करण्यावर आणि नव युवा मतदार नोंदणीवर सर्वाधिक भर द्या”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *