Minister of State for Ayush Dr. Munjpara Mahendrabhai releases a book “Science Behind Suryanamaskar”
आयुष राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई यांच्या हस्ते “सूर्यनमस्कारामागील विज्ञान” या पुस्तकाचे प्रकाशन
नवी दिल्ली : अखिल भारतीय आयुर्वेद संस्था ( एआयआयए) येथे आयुष राज्यमंत्री आणि महिला व बालविकास राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई कालूभाई यांनी “सूर्यनमस्कारामागील विज्ञान” या पुस्तकाचे प्रकाशन केले. हे पुस्तक योग आसनांवरील पुराव्यावर आधारित संशोधनाचा संग्रह आहे. एआयआयएच्या संचालिका प्रा. तनुजा मनोज नेसारी, संस्थेचे अधिष्ठाता आणि प्राध्यापकही यावेळी उपस्थित होते.
22 ते 27 ऑगस्ट 2022 या कालावधीत संस्थेत आयोजित निरंतर वैद्यकीय शिक्षण (सीएमई ) कार्यक्रम 2022 च्या आयोजकांचा सत्कार करण्यासाठी मंत्र्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. नवी दिल्लीतील राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाच्या (आरएव्ही )सहकार्याने स्वास्थ्यवृत्त, पंचकर्म आणि द्रव्यगुण या विभागांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
“सूर्यनमस्कारामागील विज्ञान” हे पुस्तक अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या स्वास्थ्यवृत्त आणि योग विभागाने संकलित केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन करताना, कठोर परिश्रमासाठी आणि भारतीय परंपरा आणि उपचार पद्धतींचा वैज्ञानिक आधार अधोरेखित करण्यासाठीच्या प्रयत्नांसाठी, संस्थेतील शिक्षक आणि विद्वानांचे डॉ.महेंद्रभाई यांनी अभिनंदन केले.
निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यक्रमातील सहभागींना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साधनांचे प्रशिक्षण दिले जात आहे आणि त्यांच्या फायद्यासाठी पंचकर्म प्रक्रियेचे वैज्ञानिक सत्र आणि संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेटींचे आयोजन करण्यात आले आहे, याचे कौतुक डॉ.महेंद्रभाई यांनी यावेळी केले. रोगप्रतिकारकक्षमता शास्त्र, पर्यावरण, आरोग्य, उपचारात्मक योग आणि मूलभूत वैद्यकीय आकडेवारी या विषयावरील विविध ज्ञानवर्धक सत्रांसह भारतातील आयुर्वेदिक अभ्यासाचा दर्जा नक्कीच उंचावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आयुर्वेदाने आता जागतिक स्वीकृती कशी मिळवली आहे आणि आयुर्वेदाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचा काय अर्थ आहे, याबद्दल सूक्ष्म दृष्टिकोन सामायिक करत त्यांनी उपस्थितांना प्रोत्साहित केले.
मंत्र्यांनी रुग्णालय परिसरातील नवीन पंचकर्म कक्षाचे उद्घाटन केले आणि एआयआयएसाठी ई-रिक्षा आणि सार्वजनिक रुग्णवाहिकेला हिरवा झेंडा दाखवला.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com