Research on a new method of pedagogy by the Department of Education
शिक्षणशास्त्र विभागाकडून अध्यापनशास्त्राच्या नव्या पद्धतीवर संशोधन
प्रकल्प आणि सामंजस्य कराराच्या माध्यमातून संशोधन आणि सामजिक उपक्रम
पुणे : पारंपरिक अध्यापन पद्धतीच्या पलीकडे जात नवीन अध्यापन पद्धती निर्माण करण्याच्या प्रक्रियेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापकांकडून संशोधन सुरू आहे. विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभगाच्या ‘एज्यू रिफॉर्म’ या युरोपिअन युनियन सोबतच्या प्रकल्पात हे काम सुरू आहे. दरम्यान विद्यापीठाने तीन वर्षात दीडशे सामंजस्य करार केले असून शिक्षणशास्त्र व विस्तार विभागानेही यात अनेक करार केले आहेत. तसेच अनेक विभागात सामाजिक उपक्रमही राबविण्यात येत आहेत.
‘एज्यू रिफॉर्म’ प्रकल्प
याबाबत माहिती देताना शिक्षणशास्त्र विभागाचे विभागप्रमुख व विद्यापीठाचे प्र- कुलगुरू संजीव सोनवणे म्हणाले, युरोपियन युनियन सोबतच्या या प्रकल्पावर भारतातील चार तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील चार विद्यापीठे काम करत आहेत. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देखील आहे. ‘इम्पॅक्ट ऑफ फोर्थ इंडस्ट्रियल रेविल्युशन ऑन इंडियन सोसायटी’ हा विषय घेत पारंपरिक अध्यापन पद्धतीच्या पलीकडे जात नवीन अध्यापन पद्धती विकसित करण्यात येत आहेत. विभागातील डॉ.संजीव सोनवणे, डॉ.वैभव जाधव, डॉ.निशा वळवी हे प्राध्यापक या विषयावर काम करत आहेत. याच प्रकल्पातील संशोधनासाठी विभागातील विद्यार्थी देखील वेगवेगळ्या देशात जात तेथील अध्यापन पद्धती जाणून घेत आहेत.
आजवर शिक्षणशास्त्र व विस्तार विभाग आणि प्रशाळेत नॉर्वे, फिनलंड, स्पेन, इटली ल्याटविया, जर्मनी युरोपातील देशासह ऑस्ट्रेलिया अशा देशांमधील विद्यापीठांशी सामंजस्य करार करून जागतिक दर्जाचे २२नवीन अध्यापन शास्त्राचे तंत्र व अध्यापन क्षमता मापन तंत्र विकसित केले तसेच विविध उपक्रमांची, संशोधनाची प्रक्रिया विभागात सुरू आहे.
– प्रा.डॉ.संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू
नॉर्वे आणि मेलबर्न आणि फिनलॅड येथील आऊलू विद्यापीठासोबत सामंजस्य करार
याबाबत माहिती देताना विभागातील प्राध्यापक डॉ.वैभव जाधव म्हणाले, युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ ईस्टर्न नॉर्वे सोबतचा जो करार आहे त्या माध्यमातून प्राध्यापक आणि विद्यार्थी यांची देवाण घेवाण, दोन देशांमधील अध्यापन पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास केला जातो तर ‘ई कंटेंट’ निर्मिती केली जाते. तसेच शाश्वत भविष्यासाठी शिक्षक अध्यापन असे काही ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
मेलबर्न विद्यापीठासोबत झालेल्या कराराच्या माध्यमातून बालशिक्षण या विषयात ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला आहे. मुख्य म्हणजे हा अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील मार्गदर्शक तत्वानुसार तयार करण्यात आला आहे.
फिनलॅड येथील आऊलू विद्यापीठाशी झालेल्या करारातून देखील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना एकमेकांच्या विद्यापीठात जात संशोधन करता येणार आहे. वैश्विक नागरिकत्व, जीवन कौशल्य आदी जागतिक पातळीवर अध्यापन शास्त्रात या निमित्ताने काम केले जात आहे.
दिव्यांग आणि अंध विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम
शिक्षणशास्त्र विभागाने ध्रुव एक्युकेशन या संस्थेसोबत सामंजस्य करार केला असून त्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक शिक्षण या विषयात प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. तर विभागातच २००८ पासून अंध विद्यार्थ्यांसाठीचे केंद्र असून त्या माध्यमातून अंध विद्यार्थ्यांना मोफत कॉम्पुटर आणि जावा वेब डेवलपमेंट कोर्स चालविण्यात येतात.
डॉ सोनवणे म्हणाले, सद्यस्थितीत विभागात शिक्षणशास्त्र विषयातीलदोन पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम, तर एक एकत्रित पदवी अभ्यासक्रम सुरू आहे. येणाऱ्या वर्षात आणखी दोन एकत्रित पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com